Wednesday, 14 March 2018

'आमुच्या मनामनांत दंगते मराठी...'


आमुच्या मनामनांत दंगते मराठी।
आमुच्या रगारगात रंगते मराठी।
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी।
आमुच्या नसानसात नाचते मराठी।।

या कविवर्य सुरेश भटांच्या लोकप्रिय 'मायबोली' कवितेमध्ये आपल्याला मराठी बद्दल '....जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' या बाबत नक्कीच अभिमान निर्माण होईल अशी स्फूर्ती मिळते.  संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सर्व भाषांमध्ये मराठी शोभिवंत आहे हे सांगितले आहे. आज मराठी भाषेचे संवर्धन व्हावे व ती काळाच्या आड जावू नये म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न चालू आहेत. आता सध्या मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी व ती ज्ञानभाषा बनविन्यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
        मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने आजवर  सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.
       भाषा टिकवून ठेवायची असल्यास साहित्य निर्मिती खूप आवश्यक आहे. त्यासाठी दर्जेदार साहित्य हे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. भाषेला काही निकषांवर अभिजात दर्जा मिळून भाषा लगेच किंवा काही काळात समृद्ध होणार नसते. त्यासाठी अनेक कष्ट हे सर्वांना घ्यावेच लागणार आहे. जो पर्यंत समाज हा साहित्य वाचत नाही, त्यात योगदान देत नाही , तो पर्यन्त कुठलीही भाषा ही कालबाह्य होण्याच्या स्वरूपातच असते. सध्या वाचन , लिखाण संस्कृती ही वाढत्या जागतीकरणांमुळे काही अंशी  मागे जात आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या #ट्विटरसंमेलन यावरुन अनेक साहित्य रसिकांनी आपल्या साहित्यकृतीचे सादरीकरण केले.हा असा प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यासाठी खुला असणारा अभिनव उपक्रम सुद्धा कधी कधी भाषेचा प्रवाह चालू ठेवण्यात फलदायी ठरत असतो.
         आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुणाईला
इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण सध्याच महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण  व नव्या जगाची भाषा ही  इंग्रजीतून होत आहे. तर दुसरीकडे काही जण इंग्रजी भाषा एक प्रतिष्ठेची भाषा वाटते, म्हणून तिचा अवलंब करतांना दिसत आहेत. मग हीच तरुण मंडळी पुढे कुटुंब, परिवार या मध्ये बांधले जातात.तेव्हा मात्र  यांच्या नव्या पिढीला व  त्यांच्या मुलांना मराठी येत नाही, आली तरी ती तोडकी मोडकी येत असते.त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ ही नष्ट होते. त्यासाठी मराठी ही भाषा टिकवने हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

     काल झालेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण पुन्हा सर्व जण भाषा समृद्धि व संवर्धनासाठी  एकत्र येऊन तिच्या साठी प्रयत्न करुयात आणि पुन्हा मराठीला एक नवे वैभव प्राप्त करुण देण्यासाठी जोमाने जे जे शक्य होईल ते ते करुयात. कारण सध्याचे जग हे तर पूर्णपणे डिजीटल होत आहे, त्यामुळे या डिजीटल युगात आपण यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतो हे यापुढचे एक आव्हानचं राहणार आहे.

Tuesday, 13 March 2018

‘श्रम ही है श्रीराम हमारा’.....(घनश्याम येनगे)


     श्रमसंस्कार छावणी माझ्यासाठी उर्जेचा एक स्रोत आहे. अनेक प्रेरणादायी व्यक्ती आणि अनुभव इथे भेटतात. बाबांनी आणि आमटे कुटुंबानी घडवलेल्या अनेक ध्येयवेड्या कार्यकर्त्यांनी उभा केलेले प्रचंड मोठे काम पहायला मिळते. प्रचंड ऊर्जा मिळते, मित्र मिळतात, आयुष्यभराचे संचित मिळते. काय आहे ही छावणी आणि माझा छावणीशी कसा संबंध आला हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बाबांच्या एकूण विचारात ‘श्रम’ या संकल्पनेला विशेष महत्व दिलेलं आहे. त्यांच्या काही वाक्यांमधून, घोषणांमधून हेच प्रतीत होत, जसं की-
  • ‘श्रम ही है श्रीराम हमारा’
  • ‘ हाथ लगे निर्माण में, नही मांगने, नही मारने’
  • “कष्ट करुन घामेजलेलं शरीर हेच परमेश्वराचं रुप आहे. खरोखरची क्रांती कधीच विनाशकारी नसते.ख-या क्रांतीतून मोठं कार्य उभं रहातं. अशी क्रांती रक्तलांछित नसते तर कष्टाच्या घामाने थबथबलेली असते.”

                  आनंदवन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर बाबांच लक्ष तरुणाईकडे गेलं. तरुणाई घडवणा-या शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी त्यांना जाणवत होत्या. 
              'शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते! दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात! याशिवाय, लोकसंख्येचा एक फार मोठा भाग उत्पादनकार्यापासून दीर्घकाळ अलग राहतो. शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणासाठी शहरात येऊन आपल्या वातावरणापासून एकदम तोडला जातो. त्याचे पाय परत खेडय़ाकडे वळत नाहीत. शेतीला श्रेष्ठ प्रतिभा आणि कर्तृत्व यापासून वंचित करणे, हा आजच्या शिक्षणाचा सर्वात मोठा दोष आहे असे मला वाटते.’’ त्यांचे हे शिक्षणविषयक विचार आमलात आणण्यासाठी श्रमाला दूर ठेवणाऱ्या तरुणाईवर श्रमाचा संस्कार व्हावा म्हणून श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठाची (वर्कर्स यूनिवर्सिटी) कल्पना त्यांना सुचली.
                   त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल! ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश होता. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती! शेती, शेतीपूरक उद्योग, मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि सहकार या नवसमाजरचनेच्या पायाभूत तत्त्वांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हे नवशिक्षणाचं वस्त्र विणलं जाईल असं ते म्हणत. वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय, सहकारी शैक्षणिक अधिकोष, साहित्यिक सहकारी संस्था, मुद्रण महाविद्यालय इत्यादी प्राथमिक स्वरूपाच्या सहकारी संस्थांच्या पायावर उभी उच्च, उच्चतर सहकारी संस्था अशी पिरॅमिडसारखी उभारणी बाबांच्या मनात होती.
                     बाबांनी महाराष्ट्र सरकारकडे रीतसर अर्ज केला आणि १९६६ साली चांदा जिल्ह्यतल्याच मूल या तालुक्याच्या ठिकाणाजवळील मारोडा खेडय़ालगत १९२४ एकर जंगल जमीन महारोगी सेवा समितीला मिळाली. परंतु बाबांना ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’साठी मिळालेल्या जमिनीपकी ईशान्येकडील सुमारे ७०० एकर जमीन अतिक्रमित होती. तिथे लोक वस्ती करुण राहत होते व शेतीही करत होते. त्यांचे म्हणणे होते, की जमीन अतिक्रमित असली तरी शेतकऱ्यांच्या मालकीचीच आहे. कारण गेली अनेक वर्ष ते ती कसत आहेत. आणि बाबांच्या प्रस्तावित योजनेमुळे त्यांच्या पोटावर पाय येणार आहे. मारोड़याच्या या ग्रामस्थांनी या जमिनीसाठी संघर्ष उभा केला. 
               कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज असल्याने तिथून वाहणारया ओढ्याचे पाणिही वापरन्यास विरोध केला. बाबांनी त्या जमीनीचा त्याग केला नि महारोगी समितीला त्या ठिकाणी १२१९ एकर जमीन मिळाली. ही जमीन ताडोबाच्या जंगलाला खेटून असल्याने इथलं जंगल म्हणजे प्राण्यांचं माहेरघरच. तिथे जवळच असलेल्या सोमनाथ (महादेव) मंदिरामुळं या प्रकल्पाला सोमनाथ असं नाव पडलं. बाबांनी सोमनाथ हा ‘स्वयंपूर्ण शेतकी’ प्रकल्प म्हणून विकसित केला. सोमनाथ तर आता गांधीजींच्या स्वप्नातलं खेडं बनलं आहे. सोमनाथमधले बरे झालेले कुष्ठरोगी त्यांचे रक्त, घाम मातीत मिसळून, त्यांची स्वतःची सांसाधने वापरून कष्ट करुन एकत्र राहतात. सोमनाथमध्ये कुष्ठरोग्यांनीच धान्याचे कोठार उभारलं आहे आणि मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय..आदी शेतीपूरक व्यवसायांचंही सोमनाथ केंद्र बनले आहे. बाबांना वर्कर्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पुरेशी जमीन न मिळाल्याने सोडुन द्यावे लागले होते, तरी या ठिकाणी ‘मॅनपॉवर ट्रेनिंग सेंटर’ उभं राहावं यादृष्टीने बाबांचं काम पहिल्या दिवसापासूनच सुरू झालं होतं. त्या अनुषंगाने ‘How to build a man’ ही संकल्पनेवर विचार सुरु केला. 
             प्रचलित शिक्षणपद्धतीमुळे समाजजीवनाच्या वास्तवापासून नकळत दूर गेलेल्या रित्या तरुण मनाला समाजाच्या गाभ्याचा स्पर्श व्हावा यासाठी काहीतरी केलं पाहिजे, यादृष्टीने बाबा प्रयत्नशील होते.  बाबांचे हे प्रयत्न सोमनाथमध्ये प्रत्यक्षात आले एका छावणीच्या माध्यमातून.. जिचं नाव : ‘आंतर-भारती श्रम-संस्कार छावणी’! ‘आंतर-भारती’ आणि ‘श्रम-संस्कार’ हे दोन्ही शब्द सानेगुरुजींचेच. भारतात अनेक प्रांत असतील, तरीही प्रत्येक भारतीयाचे अंत:करण एकच.. अशी ‘आंतर-भारती’ची संकल्पना. गुरुजींनी आपल्या हृदयीच्या सर्व सद्भावना एकवटून दिलेल्या ‘आंतर-भारती’ या शब्दास बाबा एकतेचा राजमार्ग (Blueprint) म्हणत! बाबांचा विचार होता की, या छावणीच्या माध्यमातून निरक्षर शेतमजूर आणि शिकलेला बेकार तरुण हे दोन थर एकमेकांत कामाच्या माध्यमातून मिसळले जातील; श्रमातील प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेच्या शोधातले श्रम या दोघांचा येथे संयोग होईल आणि एका ‘समूह-जीवन-प्रयोगाचा संस्कार’ त्यांच्यात रुजेल. 
            आधी ‘युवक प्रगती सहयोग’ नावाने एक छोटेखानी श्रम-शिबीर १९६७ च्या डिसेंबरमध्ये आनंदवनात पार पडलं. आणि पहिली ‘आंतर-भारती श्रम-संस्कार छावणी’ बाबांनी १९६८ च्या मे महिन्यात रणरणत्या उन्हात सोमनाथला आयोजित केली. बाबांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतभरातून १४००-१५०० युवक-युवती छावणीत सहभागी झाले होते. मूल-सोमनाथ हे नऊ मैलांचं अंतर डोक्यावर सामान घेऊन पायी तुडवत प्रत्येकजण दाखल झाला होता. पहाटेपासून सहा तास जंगलसफाई, शेतीची बांधबंदिस्ती, मोठमोठाले दगड काढणं, इत्यादी अंगमेहनतीची कामं चालत. दुपारी विविध विषयांवर चर्चा, भाषणं, वादविवाद झडत. भरपूर विचारमंथन चालत असे. त्यानंतर रात्री कधी सांस्कृतिक कार्यक्रम, कधी बाबांकडून विविध रोमांचकारी घटनांचं कथन, तर कधी वाघ पाहण्यासाठी जंगलभ्रमण! अशा प्रकारे पहिली पंधरा-दिवसीय छावणी पार पडली. पुढे छावणी हा वार्षिक उपक्रम तर झालाच; तसंच सोमनाथचं एक वैशिष्टय़ही! ही छावणी सकारात्मक श्रमसंस्कृती, धर्मनिरपेक्ष मूल्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी प्रयत्नशील असते. बाबा असे म्हणत- शिबीरात सहभागी झालेल्या १५०० युवक-युवतींपैकी एकाने जरी आपला वेळ, बुध्दी व शक्ती विकासाच्या कामी खर्च केली तरी आपल्या शिबीराला प्रचंड यश मिळेल, असं मी म्हणेन.”  आणि ते खरंच होत अशा कितीतरी यशाच्या गाथा सांगता येतील. महाराष्ट्रात नामवंत म्हणून गाजलेली सुनीलकुमार लवटे, के. आर. दाते, चंद्रकांत शहा, अनिल अवचट, नागेश हडकर,कुमार शिराळकर, कुमार सप्तर्षी, दीनानाथ मनोहर, मुरलीधर शहा,अतुल शर्मा, सोमनाथ रोडे, अशोक बेलखोडे, माधव बावगे, गिरीश कुलकर्णी ही सगळी मंडळी सोमनाथच्या मातीतून घडलेली आहेत. 
          २००८ साली मी पहिल्यांदा या शिबीराला गेलो होतो. त्यावर्षी सोमनाथला बिबट्यांचा त्रास सुरु होता म्हणून शिबीर आनंदवनात झालं. अनंदवनात झालेले ते पहिलेच शिबीर होते. मी नववीत असताना ‘समिधा’ हे साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र वाचलेले. ती माझी आनंदवनाशी आणि बाबा आमटेंशी पहिली ओळख. ‘समिधा’ वाचल्यानंतर मी खुप भारावून गेलो होतो, वेडा झालो होतो.आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा हे सर्व पाहण्याची बाबांना भेटण्याची तीव्र इच्छा मनात जागृत झाली होती. समिधामध्येच मी शिबीराविषयी वाचलं होतं आणि तेव्हापासून शिबीरात जायचं ठरवलं होतं. बाबांसोबत भामरागड साहस सहलीत, दुस-या भारत जोडो यात्रेत आणि पंजाब शांतीयात्रेत सहभागी असलेले माधव बावगे हे आमच्या कुटुंबाचे मित्र व शेजारी आहेत आणि ते स्वतः सोमनाथ शिबीराचे गेले काही वर्ष संयोजक होते.  त्यांच्याच माध्यमातून मी जायचं ठरवलं आणि तो योग दहावीनंतरच्या सुट्ट्यांमध्ये आला; पण तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये बाबांचे निधन झाले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, याचं दुःख आजही आहे. विदर्भातला उन्हाळा तोपर्यंत फक्त पेपरमध्येच वाचला होता. प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर ४० ते ४५ डिग्री कधीकधी ४८ डिग्री तापमान अनुभवायला मिळालं. अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात तिथं काम करण्याचं थ्रीलही होतं. पहाटे ४ वाजता बाबांच्या गीतांनी शिबीर परिसराला जाग येते. पाच वाजेपर्यंत आवरुन चहा घेऊन सगळे ध्वजाजवळ येतात. ध्वजवंदन झालं की ‘नौजवान आओ रे’, ‘जोडो भारत’ ही गीतं गायली जातात. ग्रुप पाडून ग्रुपनिहाय कामं वाटून दिली जातात. शेतातली उन्हाळ्यातली वेगवेगळी कामं, तलावातला गाळ काढणे, आनंदवन पध्दतीचे बंधारे बांधणे, खोदकाम, स्वच्छता अशा प्रकारची कामे सध्याच्या छावणीमध्ये असतात. तर दोन ग्रुप जेवणाच्या व्यवस्थेचं आणि निवासाच्या ठिकाणच्या स्वच्छतेचं काम पाहतात. श्रमदानानंतर आंघोळ करुन आराम झाल्यानंतर दुपारी मार्गदर्शनपर सत्र असते. संध्याकाळी सोमनाथ परिसरात फिरणं, खेळ..इ आणि मग संध्याकाळी जेवण झालं की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. नृत्य, गाणं, नाटक, पथनाट्य..अशा वेगवेगळ्या गोष्टी सादर होतात. तसंच वृक्षदिंडीसारखा एक अभिनव उपक्रमही इथे सादर होतो. 
           एका सजवलेल्या पालखीत वृक्ष ठेऊन पारंपरिक वाद्यांचा गजर करत ही दिंडी शिबीर परिसरात फिरते व शिबीरात आलेल्या लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण होते. या शिबीराने आम्हाला काय दिलं,असेल तर या शिबीरामुळं आम्हाला समाजातल्या मुख्य समस्यांची ओळख झाली. आपली समाजव्यवस्था अशी का आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत..याविषयी विचार करायला सुरुवात होते. शारीरिक कष्टाची कामे करणारी आपल्या आजूबाजूला असंख्य लोक  असतात. त्यांना समाजात हलक्या दर्जाचं समजलं जातं;पण इथं आम्हाला श्रमप्रतिष्ठा हे मूल्य समजल. या सा-या श्रमिकांमुळेच, कष्टक-यांमुळेच देश चालतो, ही बाब समजली.

   






-घनशाम येनगे. (रानडे इंस्टिट्यूट, पुणे)

--------------------------------------------------------------