Friday, 9 February 2018

बाबा आमटे दहावा स्मृती दिन विशेष लेख ...... (घनश्याम येनगे)

      बाबा आमटेंना ओळखत नाही असा सार्वजनिक जीवनातील व्यक्ती दुर्मिळच असेल. त्यांनी मुख्यतः कुष्ठरुग्णांसाठी उभारलेले आनंदवन, अशोकवन, सोमनाथ प्रकल्प; माड़िया गोंड या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील भागातील आदिवासींसाठी 'हेमलकसा' येथे उभारलेला लोकबिरादरी प्रकल्प हे त्यांनी उभे केलेले संस्थात्मक काम आपण सगळे बऱ्यापैकी जाणून आहोत. बाबांचा ‘भारत-जोडो यात्रा’ आणि ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ यांच्यामधील सहभाग गांधींच्या 'रचनात्मक संघर्ष' या विचाराचे अनुकरण होता. बाबा कवी म्हणून प्रचंड प्रतिभाशाली होते. 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम', 'माती जागवील त्याला मत' हे बाबांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ज्वाला आणि फुले बद्दल तर असे म्हटले जाते की त्याचा इंग्रजी अनुवाद जर त्या वेळी आला असता तर त्या वर्षीचे नोबेल पारितोषिक बाबा आमटेंना मिळाले असते. बाबांनी 'उज्वल उद्यासाठी' हे तरुणांसाठी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिले आहे आणि 'सार्वजनिक संस्थांचे संचालन' हे छोटे पुस्तक संस्था कशा चालवाव्यात यावर लिहिले आहे. बाबा आपल्या ९३ वर्षांच्या आयुष्यात इतक्या आव्हनांना सामोरे गेले आणि प्रचंड असे मोठे काम उभे केले की त्यांच्या हयातीतच ते एक आख्यायिका बनले होते. या लेखात आपण आनंदवन स्थापन करण्यापूर्वी बाबांनी काय काय प्रयोग केले ते जाणून घेऊयात.
     नागपुरातील धरमपेठ या उच्चभ्रू भागातील मालगुजार कुटुंबात जन्मलेले बाबा आनंदवनापूर्वी पण फार विलक्षण आयुष्य जगले. एकाच आयुष्यात त्यांना अनेक आयुष्ये जगायची जिद्द होती आणि एकामागुन एक काम उभे करत त्यांनी ती पूर्ण केली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच एक गितात ते म्हणतातच की ''फिरुनी मी तयार सर्व टाकुनी पसारा'' नविन कामांना नविन आव्हानांना नेहमी ते तयार असत.२६ डिसेंबर १९१४  रोजी जन्मलेल्या मुरलीधर देवीदास आमटे यांच्यावर त्यांची आई लक्ष्मीबाई यांचा खुप प्रभाव पडला. बाबा आमटे यांच्यात असणारी आक्रमक करुणा त्यांना त्यांच्या आईकडूनच वारसा हक्काने मिळाली आहे. बाबा तरुण असतानाचा काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा होता. सुरुवातीला बाबा क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. बाबा पैलवान होते, व्यायामाने कमावलेले शरीर काहीतरी आव्हानात्मक करण्यास असुसले होते. बाबांना या काळात 'छोटा बजरंग' म्हणूनच ओळखले जाई. या व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातुनच हुतात्मा राजगुरु यांच्याशी त्यांचा संपर्क आला व मैत्रीही झाली. सॉण्डर्सचा खून केल्यानंतर राजगुरु हे भूमिगत असताना एकदा बाबांच्या घरी नागपुरला राहिले होते.
        वडीलांच्या इच्छेखातर बाबांनी नागपुरात वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. (खरे तर बाबांना डॉक्टर व्ह्ययचे होते. ते म्हणायचे माझ्या नावातच  एम. डी. आहे) आत्ताच्या छत्तीसगढ़ मधील दुर्ग या गावी बाबांनी सुरुवातीला वकिली केली. १९३९-४० ला ते वरोरा येथे वकिलीसाठी आले. याचे कारण तेथील त्यांची गोरजा येथील वंशपरंपरागत असलेली जमिन. त्याच्यावरही पोराने आता लक्ष ठेवावे ही वडिलांची अपेक्षा. त्या वेळी महात्मा गांधींचा आणि बाबांचा संपर्क आला. वरोऱ्यापासून ६० मैलांवर असलेल्या सेवाग्राम येथे गांधीजींनी सुरू केलेला आश्रम हा त्या काळात देशाच्या राजकारणाचं केंद्र बनला होता. गांधीजींनी कुटिरोद्योग, खादी, सूतकताई, बुनियादी शिक्षण अशा विविध कल्पना अमलात आणायला सुरुवात केली होती. त्या, त्या विषयातील तज्ज्ञ सेवाग्रामात येऊन राहू लागले. बाबांना या सर्वाची ओढ वाटू लागली. बाबांवर गांधीजींच्या विचारांची पकड बसली. बाबांच्या सेवाग्रामच्या खेपा वाढल्या. अंगावर खादी आली. घरात चरखा चालू लागला. एकूणच बाबांचं आयुष्य आरपार बदलून गेलं. अत्यंत ऐशोआरामी असलेली बाबांची जीवनशैली बदलून गेली. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या केसेस बाबांनी मोफत लढवल्या. गुन्हेगारांची वकिली करून तुंबडया भरणारे वकील अनेक होते, पण श्रमिकांच्या हक्कांसाठी लढणारा वकील होणं बाबांनी स्वीकारलं.

       बाबांनी एक अनोखा प्रयोग त्या काळात केला. त्यांनी वामनराव स्वान आणि बाबूकाका खिस्ती या दोघा वकील मित्रांसोबत सहकारी तत्त्वावर वकिली व्यवसाय सुरू केला. तिघांचं मिळून एकच बँक खातं होतं; ज्यामधून तिघांपैकी कोणीही, कितीही पैसे केव्हाही काढू शकत असे. हे तीन मित्र मिळून फक्त गरीब अशिलांचीच प्रकरणं चालवीत असत. हा त्या काळातील एकमेव असा प्रयोग होता. मात्र बाबांना वकिलीच्या आपल्या व्यवसायात फार आनंद वाटत नव्हता. १२ तास मजूरी करुन जे कष्टकरी कमावतो तेच १२ मिनिटाची बड़बड़ करून वकील कमावतो हे समीकरण त्यांना अस्वस्थ करायचे. या काळात बाबा त्यांच्या गोरजा येथील वडीलोपार्जित जमिनीवर लक्ष घालत होते. गोरजा आणि आजूबाजूच्या गावखेडयातील दलित आणि एकूणच कष्टकरी वर्गाची दुरवस्था बाबांना जवळून अनुभवता आली. स्वत:ला उच्चवर्णीय समजणाऱ्यांच्या प्रचंड प्रतिरोधाचा सामना करत बाबांनी गोरजेतली विहीर हरिजनांसाठी खुली केली. त्यांना पक्की घरं बांधायला मदत केली. त्यांच्यासोबत ते जेवू लागले. भजनं म्हणू लागले. काठावर उभं राहून प्रश्नाचं तटस्थ निरीक्षण न करता थेट प्रवाहात झोकून देण्याच्या आपल्या स्वभावामुळे बाबा कष्टकऱ्यांमध्ये त्यांचाच एक भाग बनत मिसळले. बाबांचे हे वागणे मात्र त्यांच्या वडिलांना पसंत पड़ने शक्य नव्हते. त्यांनी बाबांचा विवाह करण्याचे ठरवले. परंतू फकीरी वा कलंदर वृत्ती स्विकारलेल्या बाबांनी याला काही मान्यता दिली नाही. लग्न करून संसारात पडत चाकोरीबद्ध आयुष्य जगावं लागणार, या नुसत्या कल्पनेनेही बाबांना गुदमरल्यासारखं वाटायचे. बाबांनी या काळात भगवे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आपली दाढ़ी वाढवली व ईश्वराचा शोध घेत त्यांनी हिमालयातील अनेक आश्रम पालथे घातले. पण महंत, साधू यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर बाबांच्या लक्षात आलं की, आपला भविष्यकाळ असं गुहेत, समाजापासून, जनसामान्यांच्या दु:ख-वेदनांपासून दूर राहण्यात नाही. बाबा वरोऱ्याला परत आले; पण ते संन्याशाची वस्त्रं धारण करूनच जगत राहिले.

          मात्र साधना ताईंचे त्यांच्या आयुष्यात याच काळात आगमन झाले. एका नातेवाईकाच्या लग्नाची बोलणी करण्यास नागपुरच्या घुले यांच्या वेदशास्त्रसंपन्न कर्मठ कुटुंबातील घरी बाबांचे जाने झाले. त्याच घरातील त्यांची धाकटी मुलगी इंदु बाबांच्या मनात भरली. बाबांच्या घुले यांच्या घरातील चकरा वाढल्या इंदु यांचे पण बाबांवर प्रेम बसले. हे लक्षात आल्यास बाबांनी इंदुसाठी स्वतःच मागणी घातली. संन्यासी असणाऱ्या व ज्यांचा काही भरवसा नाही अशा बाबांशी इंदुने लग्न करू नये अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. पण इंदु घुले या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या व त्यांचे यथासांग लग्न पार पडले. लग्नानंतर बाबांनी त्यांचे नाव साधना ठेवले व त्या त्याच नावानी पुढे ओळखल्या गेल्या. साधना ताईंनी पुढे आयुष्यभर बाबांची त्यांच्या प्रत्येक कामात भक्कम साथ दिली. या दोघांचे एकरूपत्व इतके होते की बाबांच्या कुठल्याही उपक्रमाच्या यशस्वीतेची चर्चा साधना ताईंशिवाय पूर्ण होत नाही.
      लग्नानंतर दोघेही वरोरा गावात राहु लागले. या काळात बाबांचे वकिलीत मन रमत नव्हते आणि वडिलोपार्जित जमिनीची देखभाल करणे ही आवडत नव्हते. त्यामुळे साधना ताईंशी बोलून त्यांनी ही दोन्ही कामे सोडुन दिली. गांधी विचारांची पुस्तके, खादी व चरख्याचा प्रचार-प्रसार करणे हेच त्यांनी आपले उपजीविकीचे साधन बनवले. बाबा एका नव्या प्रयोगाचा विचार याच काळात करत होते. कार्ल मार्क्स च्या विचारांचा काही प्रमाणात प्रभाव बाबांवर पडला होता. पण गांधींमुळे बाबा मार्क्सवादी बनले नाहीत.

            श्रमिकांच्या संघटना हे वर्गलढयाच हत्यार म्हणून वापरण्याऐवजी, श्रमाचं म्हणून जे स्थान आहे ते श्रमिकाला मिळवून देणं हे बाबांनी महत्वाचे मानले. हे विचार आमलात आणण्यासाठी बाबांनी काही एक करुण पाहण्याचे ठरवले.वरोरा गावाबाहेर एका स्मशानभूमीला लागून एक जुना बंगला होता. तो बंगला आणि ७ एकर जमीन बाबांनी या प्रयोगासाठी मिळवली. बाबांनी त्या बंगल्याच्या फाटकावर पाटी लावली- ‘श्रमाश्रम-मित्रवस्ती.’ सफाई कामगारापासून वकिलापर्यंत असे समाजाचे सर्व थर त्यांनी येथे एकत्र केले. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी यांनी एकत्र बसुन समाजाचा व जीवनाचा विचार करावा हे बाबांना अपेक्षित होते. प्रत्येकानं आपली सर्व कमाई, मग ती रोजची, आठवडयाची, महिन्याची असो, एकत्र करायची, सर्वानी एकत्र राहायचं आणि एकत्र अन्न शिजवायचं, तिथं कुठल्याच प्रकारची जात-पात पाळायची नाही, अस्पृश्यतेला तिथं स्थान नाही असा दंडक होता आणि तसा व्यवहार होत होता. बाबांनी स्वत: लाकडं फोडणं, डोक्यावर भाजीची टोपली घेऊन बाजारात जाऊन भाजी विकणं, शेतकाम करणं, हिशेब ठेवणं इत्यादी पडतील ती  कामं तत्त्वनिष्ठेने केली. साधना ताईची त्यात पूर्ण साथ होती. त्यांनी स्वयंपाकाचं सर्व काम स्वत:कडे घेतलं. पडतील ती इतर कामंही केली. आजारी लोकांची शुश्रूषेपासून ते विहिरीतून कित्येक बादल्या पाणी काढण्यापर्यंतची कामं. बाबांच्या या प्रयोगाचे गांधीवाद्यांमध्ये खुप कौतुक झाले. पण वरोऱ्यातील लोकांनी मात्र याचे महत्व ओळखले नाही. साथ दिली नाहीच उलट हेटाळणीच केली. या प्रयोगतील लोकच वस्ती सोडुन निघुन गेले. साधना ताईही दरम्यानच्या काळात अजारी पडल्या. बाबांनी प्रयोग बंद केला.

          'श्रमाश्रमा’चा प्रयोग जरी तुटला तरी ‘श्रमातून निर्मिती होते’, ‘श्रमाने आत्मशुद्धी होते’, ही जीवनदृष्टी बाबांना या प्रयोगातून मिळाली. ‘‘अपयशातून दिशा निश्चित होत जाते आणि अपयश हे नेमक्या मार्गाकडे नेणारं वळणही ठरतं,’’ हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. महारोगी सेवा समिती व आनंदवन स्थापन करन्यापूर्वीचा हा बाबांचा शेवटचा प्रयोग होता. बाबांनी उभे केलेले आनंदवनचे काम यावर पुष्कळ लिहून आले आहे परंतु आनंदवानापूर्वी बाबा कोण होते व त्यांनी काय कामे केली हे त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यापुढे यावे हा या लेखाचा उद्देश होता.

- घनश्याम येनगे
(प्रथम वर्ष , पदव्युत्तर  पदविका , रानडे इंस्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे)
contact no.- 9028373273

No comments:

Post a Comment