Thursday, 23 August 2018

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन


 ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही  माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता,  प्रतीभासंपन्न रंगकर्मी महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे.
            मोरूची मावशी मधून महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात ते पोहचले होते. आपल्या अभिनयाने गाजवलेल्या अनेक भूमिकांमधून ते कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील.


विजय चव्हाण यांची गाजलेली नाटकं-
  • मोरुची मावशी
  • कार्टी प्रेमात पडली
  • लहानपण देगा देवा
  • तू तू मी मी
  • श्रीमंत दामोदर पंत


विजय चव्हाण यांचे गाजलेले चित्रपट-
  • वहिनीचा माया
  • घोळात घोळ
  • धुमाकूळ
  • शेम टू शेम
  • माहेरची साडी
  • बलिदान
  • शुभमंगल सावधान
  • एक होता विदूषक
  • माझा छकुला
  • चिकट नवरा
  • धांगडधिंगा
  • पछाडलेला
  • अगंबाई अरेच्चा
  • जत्रा
  • चष्मे बहाद्दर
  • इश्श्य
  • जबरदस्त
  • बकुळा नामदेव घोटाळे
  • वन रुम किचन
  • श्रीमंत दामोदर पंत

--------------------------×-------------------×-------------------

Friday, 27 July 2018

‘विधि’-लिखित book series publish

‘विधि’-लिखित’ नावाची विविध कायद्यांची सर्वंकष माहिती देणारी पुस्तक मालिका केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे प्रकाशित.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. ‘एनआरआय विवाह आणि मानवी तस्करी – समस्या आणि उपाययोजना’ या विषयांवर दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

Thursday, 24 May 2018

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2018 ... अवश्य सहभागी व्हा

मुंबईदि. २३ : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असून या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम-2018 च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचा उद्या (दि. 24 मे) शेवटचा दिवस असून त्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवकांचा उत्साहनाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानात त्यांना असलेली गती याचा फायदा प्रशासनास व्हावा यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून प्रतिभावान युवकांना प्रशासनात सहभागी होण्यासह राज्याच्या विकासाला हातभार लावता येणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून गेल्या तीन वर्षात या कार्यक्रमाला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. दरवर्षी साधारण चार हजार अर्ज प्राप्त होत असून त्यातून ५० युवकांची निवड केली जाते. मुख्यमंत्री फेलोशिप हा 11 महिन्यांचा पूर्णवेळ कार्यक्रम असून त्यात एकदाच सहभागी होता येते. कोणत्याही शाखेचा प्रथमवर्ग पदवीधर असणाऱ्या 21 ते 26 वर्षे वयोगटातील युवकांना 24 मे 2018पर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येईल. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठीhttp://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देता येईल.

फेलोजच्या निवडीसाठी ऑनलाईन परीक्षानिबंध व मुलाखत अशी निवडप्रक्रिया राबविली जाते. फेलोशिपच्या कालावधीत विविध विभागांसोबत काम करण्याच्या अनुभवासोबतच विविध मान्यवर संस्था व व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधीही फेलोजना मिळत असते. त्यामुळे राज्याच्या प्रशासनात आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday, 14 March 2018

'आमुच्या मनामनांत दंगते मराठी...'


आमुच्या मनामनांत दंगते मराठी।
आमुच्या रगारगात रंगते मराठी।
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी।
आमुच्या नसानसात नाचते मराठी।।

या कविवर्य सुरेश भटांच्या लोकप्रिय 'मायबोली' कवितेमध्ये आपल्याला मराठी बद्दल '....जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी' या बाबत नक्कीच अभिमान निर्माण होईल अशी स्फूर्ती मिळते.  संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सर्व भाषांमध्ये मराठी शोभिवंत आहे हे सांगितले आहे. आज मराठी भाषेचे संवर्धन व्हावे व ती काळाच्या आड जावू नये म्हणून अनेक प्रकारे प्रयत्न चालू आहेत. आता सध्या मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी व ती ज्ञानभाषा बनविन्यासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
        मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासकीय पातळीवरूनही प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने आजवर  सहा भाषांना हा दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम् व ओडिया या त्या सहा भाषा आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्यांना भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळते. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो तेव्हा भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोरच उमटवली जाते. मुख्य म्हणजे भाषेच्या विकासकार्यासाठी अधिक चालना मिळत जाते.
       भाषा टिकवून ठेवायची असल्यास साहित्य निर्मिती खूप आवश्यक आहे. त्यासाठी दर्जेदार साहित्य हे लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. भाषेला काही निकषांवर अभिजात दर्जा मिळून भाषा लगेच किंवा काही काळात समृद्ध होणार नसते. त्यासाठी अनेक कष्ट हे सर्वांना घ्यावेच लागणार आहे. जो पर्यंत समाज हा साहित्य वाचत नाही, त्यात योगदान देत नाही , तो पर्यन्त कुठलीही भाषा ही कालबाह्य होण्याच्या स्वरूपातच असते. सध्या वाचन , लिखाण संस्कृती ही वाढत्या जागतीकरणांमुळे काही अंशी  मागे जात आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या #ट्विटरसंमेलन यावरुन अनेक साहित्य रसिकांनी आपल्या साहित्यकृतीचे सादरीकरण केले.हा असा प्रत्येकाला अभिव्यक्त होण्यासाठी खुला असणारा अभिनव उपक्रम सुद्धा कधी कधी भाषेचा प्रवाह चालू ठेवण्यात फलदायी ठरत असतो.
         आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुणाईला
इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण सध्याच महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण  व नव्या जगाची भाषा ही  इंग्रजीतून होत आहे. तर दुसरीकडे काही जण इंग्रजी भाषा एक प्रतिष्ठेची भाषा वाटते, म्हणून तिचा अवलंब करतांना दिसत आहेत. मग हीच तरुण मंडळी पुढे कुटुंब, परिवार या मध्ये बांधले जातात.तेव्हा मात्र  यांच्या नव्या पिढीला व  त्यांच्या मुलांना मराठी येत नाही, आली तरी ती तोडकी मोडकी येत असते.त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ ही नष्ट होते. त्यासाठी मराठी ही भाषा टिकवने हे सर्वस्वी आपल्या हातात आहे.

     काल झालेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आपण पुन्हा सर्व जण भाषा समृद्धि व संवर्धनासाठी  एकत्र येऊन तिच्या साठी प्रयत्न करुयात आणि पुन्हा मराठीला एक नवे वैभव प्राप्त करुण देण्यासाठी जोमाने जे जे शक्य होईल ते ते करुयात. कारण सध्याचे जग हे तर पूर्णपणे डिजीटल होत आहे, त्यामुळे या डिजीटल युगात आपण यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतो हे यापुढचे एक आव्हानचं राहणार आहे.

Tuesday, 13 March 2018

‘श्रम ही है श्रीराम हमारा’.....(घनश्याम येनगे)


     श्रमसंस्कार छावणी माझ्यासाठी उर्जेचा एक स्रोत आहे. अनेक प्रेरणादायी व्यक्ती आणि अनुभव इथे भेटतात. बाबांनी आणि आमटे कुटुंबानी घडवलेल्या अनेक ध्येयवेड्या कार्यकर्त्यांनी उभा केलेले प्रचंड मोठे काम पहायला मिळते. प्रचंड ऊर्जा मिळते, मित्र मिळतात, आयुष्यभराचे संचित मिळते. काय आहे ही छावणी आणि माझा छावणीशी कसा संबंध आला हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
बाबांच्या एकूण विचारात ‘श्रम’ या संकल्पनेला विशेष महत्व दिलेलं आहे. त्यांच्या काही वाक्यांमधून, घोषणांमधून हेच प्रतीत होत, जसं की-
  • ‘श्रम ही है श्रीराम हमारा’
  • ‘ हाथ लगे निर्माण में, नही मांगने, नही मारने’
  • “कष्ट करुन घामेजलेलं शरीर हेच परमेश्वराचं रुप आहे. खरोखरची क्रांती कधीच विनाशकारी नसते.ख-या क्रांतीतून मोठं कार्य उभं रहातं. अशी क्रांती रक्तलांछित नसते तर कष्टाच्या घामाने थबथबलेली असते.”

                  आनंदवन थोडं स्थिरस्थावर झाल्यावर बाबांच लक्ष तरुणाईकडे गेलं. तरुणाई घडवणा-या शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी त्यांना जाणवत होत्या. 
              'शिक्षण म्हणजे माणसाच्या अभिव्यक्तीला वाट करून देणारी प्रक्रिया’ असं बाबा म्हणत. प्रचलित शिक्षणव्यवस्थेविषयी त्यांची मतं तीव्र स्वरूपाची होती. ते म्हणत, ‘‘विद्यापीठातून बाहेर पडणारा पदवीधर हा नुसता योजक (Planner) असतो. त्याचे डोके तयार झालेले असते; पण हात अकर्मण्य असतात. तंत्रशाळांतून बाहेर पडणाऱ्या कारागिराचे हात कुशल असतात, पण तो नुसता उपयोजक (Performer) असतो. या कार्यान्वयामागील योजनेशी त्याचा संबंध नसतो. अपंग बुद्धिजीवी आणि आंधळा श्रमजीवी असे कृत्रिम आणि विषम विभाजन त्यामुळे होते! दुसरं असं की, परावलंबनामुळे सरकारी अनुदानाशिवाय या शिक्षणसंस्था जिवंत राहू शकत नाहीत. केव्हातरी कुणीतरी घालून दिलेली चाकोरी गिरवीत राहणे, ही त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता होते आणि या जरठ व्यवस्थेत असंख्य प्रतिभा आपले सत्व हरवून गोल छिद्रातल्या चौकोनी खुंटय़ा होऊन बसतात! याशिवाय, लोकसंख्येचा एक फार मोठा भाग उत्पादनकार्यापासून दीर्घकाळ अलग राहतो. शेतकऱ्याचा मुलगा शिक्षणासाठी शहरात येऊन आपल्या वातावरणापासून एकदम तोडला जातो. त्याचे पाय परत खेडय़ाकडे वळत नाहीत. शेतीला श्रेष्ठ प्रतिभा आणि कर्तृत्व यापासून वंचित करणे, हा आजच्या शिक्षणाचा सर्वात मोठा दोष आहे असे मला वाटते.’’ त्यांचे हे शिक्षणविषयक विचार आमलात आणण्यासाठी श्रमाला दूर ठेवणाऱ्या तरुणाईवर श्रमाचा संस्कार व्हावा म्हणून श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठाची (वर्कर्स यूनिवर्सिटी) कल्पना त्यांना सुचली.
                   त्यांना खात्री होती की, नवनिर्मितीची एक नि:शब्द शक्ती आनंदवनाप्रमाणे ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’च्या वातावरणातच उत्पन्न होईल आणि या वातावरणातून नवी शेती, नवा सहकार, नवे उद्योग, नवे शिक्षण आणि नवे राजकारण यांचे अग्रदूत वर्कर्स युनिव्हर्सिटी समाजाला देईल! ‘विज्ञान व भारतीय जीवन यांचा समन्वय साधत भारताच्या कृषिप्रधान समाजव्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषि-औद्योगिक व्यवस्थेचे रूप देणे’ हा या प्रयोगाचा मूलभूत उद्देश होता. ‘अध्ययनातून अर्जन’ (Earning through Learning) असं या प्रयोगाचं स्थूल स्वरूप होतं. उदाहरणार्थ, डेअरी आणि संबंधित प्रक्रिया उद्योगाच्या युनिटमधून ज्ञानार्जनही होईल आणि उत्पादनाच्या माध्यमातून दुग्ध-तंत्रशाळेचे अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा खर्च भरून निघेल, किंवा वीस मजुरांच्या आठ तास कामातून जे निर्माण होते ते पन्नास मुलांच्या नियोजित गतियुक्त श्रमदानातून निर्माण होईल आणि या जोडश्रमांतून जी निर्मिती होईल, त्यातून विद्यार्थ्यांचा शिक्षण व निर्वाह खर्च भरून निघू शकेल. ‘Education for Action in Action’ अशी बाबांची मांडणी होती! शेती, शेतीपूरक उद्योग, मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि सहकार या नवसमाजरचनेच्या पायाभूत तत्त्वांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हे नवशिक्षणाचं वस्त्र विणलं जाईल असं ते म्हणत. वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालय, सहकारी शैक्षणिक अधिकोष, साहित्यिक सहकारी संस्था, मुद्रण महाविद्यालय इत्यादी प्राथमिक स्वरूपाच्या सहकारी संस्थांच्या पायावर उभी उच्च, उच्चतर सहकारी संस्था अशी पिरॅमिडसारखी उभारणी बाबांच्या मनात होती.
                     बाबांनी महाराष्ट्र सरकारकडे रीतसर अर्ज केला आणि १९६६ साली चांदा जिल्ह्यतल्याच मूल या तालुक्याच्या ठिकाणाजवळील मारोडा खेडय़ालगत १९२४ एकर जंगल जमीन महारोगी सेवा समितीला मिळाली. परंतु बाबांना ‘वर्कर्स युनिव्हर्सिटी’साठी मिळालेल्या जमिनीपकी ईशान्येकडील सुमारे ७०० एकर जमीन अतिक्रमित होती. तिथे लोक वस्ती करुण राहत होते व शेतीही करत होते. त्यांचे म्हणणे होते, की जमीन अतिक्रमित असली तरी शेतकऱ्यांच्या मालकीचीच आहे. कारण गेली अनेक वर्ष ते ती कसत आहेत. आणि बाबांच्या प्रस्तावित योजनेमुळे त्यांच्या पोटावर पाय येणार आहे. मारोड़याच्या या ग्रामस्थांनी या जमिनीसाठी संघर्ष उभा केला. 
               कुष्ठरोगाबद्दलचे गैरसमज असल्याने तिथून वाहणारया ओढ्याचे पाणिही वापरन्यास विरोध केला. बाबांनी त्या जमीनीचा त्याग केला नि महारोगी समितीला त्या ठिकाणी १२१९ एकर जमीन मिळाली. ही जमीन ताडोबाच्या जंगलाला खेटून असल्याने इथलं जंगल म्हणजे प्राण्यांचं माहेरघरच. तिथे जवळच असलेल्या सोमनाथ (महादेव) मंदिरामुळं या प्रकल्पाला सोमनाथ असं नाव पडलं. बाबांनी सोमनाथ हा ‘स्वयंपूर्ण शेतकी’ प्रकल्प म्हणून विकसित केला. सोमनाथ तर आता गांधीजींच्या स्वप्नातलं खेडं बनलं आहे. सोमनाथमधले बरे झालेले कुष्ठरोगी त्यांचे रक्त, घाम मातीत मिसळून, त्यांची स्वतःची सांसाधने वापरून कष्ट करुन एकत्र राहतात. सोमनाथमध्ये कुष्ठरोग्यांनीच धान्याचे कोठार उभारलं आहे आणि मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय..आदी शेतीपूरक व्यवसायांचंही सोमनाथ केंद्र बनले आहे. बाबांना वर्कर्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पुरेशी जमीन न मिळाल्याने सोडुन द्यावे लागले होते, तरी या ठिकाणी ‘मॅनपॉवर ट्रेनिंग सेंटर’ उभं राहावं यादृष्टीने बाबांचं काम पहिल्या दिवसापासूनच सुरू झालं होतं. त्या अनुषंगाने ‘How to build a man’ ही संकल्पनेवर विचार सुरु केला. 
             प्रचलित शिक्षणपद्धतीमुळे समाजजीवनाच्या वास्तवापासून नकळत दूर गेलेल्या रित्या तरुण मनाला समाजाच्या गाभ्याचा स्पर्श व्हावा यासाठी काहीतरी केलं पाहिजे, यादृष्टीने बाबा प्रयत्नशील होते.  बाबांचे हे प्रयत्न सोमनाथमध्ये प्रत्यक्षात आले एका छावणीच्या माध्यमातून.. जिचं नाव : ‘आंतर-भारती श्रम-संस्कार छावणी’! ‘आंतर-भारती’ आणि ‘श्रम-संस्कार’ हे दोन्ही शब्द सानेगुरुजींचेच. भारतात अनेक प्रांत असतील, तरीही प्रत्येक भारतीयाचे अंत:करण एकच.. अशी ‘आंतर-भारती’ची संकल्पना. गुरुजींनी आपल्या हृदयीच्या सर्व सद्भावना एकवटून दिलेल्या ‘आंतर-भारती’ या शब्दास बाबा एकतेचा राजमार्ग (Blueprint) म्हणत! बाबांचा विचार होता की, या छावणीच्या माध्यमातून निरक्षर शेतमजूर आणि शिकलेला बेकार तरुण हे दोन थर एकमेकांत कामाच्या माध्यमातून मिसळले जातील; श्रमातील प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठेच्या शोधातले श्रम या दोघांचा येथे संयोग होईल आणि एका ‘समूह-जीवन-प्रयोगाचा संस्कार’ त्यांच्यात रुजेल. 
            आधी ‘युवक प्रगती सहयोग’ नावाने एक छोटेखानी श्रम-शिबीर १९६७ च्या डिसेंबरमध्ये आनंदवनात पार पडलं. आणि पहिली ‘आंतर-भारती श्रम-संस्कार छावणी’ बाबांनी १९६८ च्या मे महिन्यात रणरणत्या उन्हात सोमनाथला आयोजित केली. बाबांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतभरातून १४००-१५०० युवक-युवती छावणीत सहभागी झाले होते. मूल-सोमनाथ हे नऊ मैलांचं अंतर डोक्यावर सामान घेऊन पायी तुडवत प्रत्येकजण दाखल झाला होता. पहाटेपासून सहा तास जंगलसफाई, शेतीची बांधबंदिस्ती, मोठमोठाले दगड काढणं, इत्यादी अंगमेहनतीची कामं चालत. दुपारी विविध विषयांवर चर्चा, भाषणं, वादविवाद झडत. भरपूर विचारमंथन चालत असे. त्यानंतर रात्री कधी सांस्कृतिक कार्यक्रम, कधी बाबांकडून विविध रोमांचकारी घटनांचं कथन, तर कधी वाघ पाहण्यासाठी जंगलभ्रमण! अशा प्रकारे पहिली पंधरा-दिवसीय छावणी पार पडली. पुढे छावणी हा वार्षिक उपक्रम तर झालाच; तसंच सोमनाथचं एक वैशिष्टय़ही! ही छावणी सकारात्मक श्रमसंस्कृती, धर्मनिरपेक्ष मूल्य, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी प्रयत्नशील असते. बाबा असे म्हणत- शिबीरात सहभागी झालेल्या १५०० युवक-युवतींपैकी एकाने जरी आपला वेळ, बुध्दी व शक्ती विकासाच्या कामी खर्च केली तरी आपल्या शिबीराला प्रचंड यश मिळेल, असं मी म्हणेन.”  आणि ते खरंच होत अशा कितीतरी यशाच्या गाथा सांगता येतील. महाराष्ट्रात नामवंत म्हणून गाजलेली सुनीलकुमार लवटे, के. आर. दाते, चंद्रकांत शहा, अनिल अवचट, नागेश हडकर,कुमार शिराळकर, कुमार सप्तर्षी, दीनानाथ मनोहर, मुरलीधर शहा,अतुल शर्मा, सोमनाथ रोडे, अशोक बेलखोडे, माधव बावगे, गिरीश कुलकर्णी ही सगळी मंडळी सोमनाथच्या मातीतून घडलेली आहेत. 
          २००८ साली मी पहिल्यांदा या शिबीराला गेलो होतो. त्यावर्षी सोमनाथला बिबट्यांचा त्रास सुरु होता म्हणून शिबीर आनंदवनात झालं. अनंदवनात झालेले ते पहिलेच शिबीर होते. मी नववीत असताना ‘समिधा’ हे साधनाताई आमटे यांचं आत्मचरित्र वाचलेले. ती माझी आनंदवनाशी आणि बाबा आमटेंशी पहिली ओळख. ‘समिधा’ वाचल्यानंतर मी खुप भारावून गेलो होतो, वेडा झालो होतो.आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा हे सर्व पाहण्याची बाबांना भेटण्याची तीव्र इच्छा मनात जागृत झाली होती. समिधामध्येच मी शिबीराविषयी वाचलं होतं आणि तेव्हापासून शिबीरात जायचं ठरवलं होतं. बाबांसोबत भामरागड साहस सहलीत, दुस-या भारत जोडो यात्रेत आणि पंजाब शांतीयात्रेत सहभागी असलेले माधव बावगे हे आमच्या कुटुंबाचे मित्र व शेजारी आहेत आणि ते स्वतः सोमनाथ शिबीराचे गेले काही वर्ष संयोजक होते.  त्यांच्याच माध्यमातून मी जायचं ठरवलं आणि तो योग दहावीनंतरच्या सुट्ट्यांमध्ये आला; पण तत्पूर्वीच फेब्रुवारीमध्ये बाबांचे निधन झाले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, याचं दुःख आजही आहे. विदर्भातला उन्हाळा तोपर्यंत फक्त पेपरमध्येच वाचला होता. प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर ४० ते ४५ डिग्री कधीकधी ४८ डिग्री तापमान अनुभवायला मिळालं. अशा कडाक्याच्या उन्हाळ्यात तिथं काम करण्याचं थ्रीलही होतं. पहाटे ४ वाजता बाबांच्या गीतांनी शिबीर परिसराला जाग येते. पाच वाजेपर्यंत आवरुन चहा घेऊन सगळे ध्वजाजवळ येतात. ध्वजवंदन झालं की ‘नौजवान आओ रे’, ‘जोडो भारत’ ही गीतं गायली जातात. ग्रुप पाडून ग्रुपनिहाय कामं वाटून दिली जातात. शेतातली उन्हाळ्यातली वेगवेगळी कामं, तलावातला गाळ काढणे, आनंदवन पध्दतीचे बंधारे बांधणे, खोदकाम, स्वच्छता अशा प्रकारची कामे सध्याच्या छावणीमध्ये असतात. तर दोन ग्रुप जेवणाच्या व्यवस्थेचं आणि निवासाच्या ठिकाणच्या स्वच्छतेचं काम पाहतात. श्रमदानानंतर आंघोळ करुन आराम झाल्यानंतर दुपारी मार्गदर्शनपर सत्र असते. संध्याकाळी सोमनाथ परिसरात फिरणं, खेळ..इ आणि मग संध्याकाळी जेवण झालं की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. नृत्य, गाणं, नाटक, पथनाट्य..अशा वेगवेगळ्या गोष्टी सादर होतात. तसंच वृक्षदिंडीसारखा एक अभिनव उपक्रमही इथे सादर होतो. 
           एका सजवलेल्या पालखीत वृक्ष ठेऊन पारंपरिक वाद्यांचा गजर करत ही दिंडी शिबीर परिसरात फिरते व शिबीरात आलेल्या लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण होते. या शिबीराने आम्हाला काय दिलं,असेल तर या शिबीरामुळं आम्हाला समाजातल्या मुख्य समस्यांची ओळख झाली. आपली समाजव्यवस्था अशी का आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत..याविषयी विचार करायला सुरुवात होते. शारीरिक कष्टाची कामे करणारी आपल्या आजूबाजूला असंख्य लोक  असतात. त्यांना समाजात हलक्या दर्जाचं समजलं जातं;पण इथं आम्हाला श्रमप्रतिष्ठा हे मूल्य समजल. या सा-या श्रमिकांमुळेच, कष्टक-यांमुळेच देश चालतो, ही बाब समजली.

   






-घनशाम येनगे. (रानडे इंस्टिट्यूट, पुणे)

--------------------------------------------------------------

Friday, 9 February 2018

बाबा आमटे दहावा स्मृती दिन विशेष लेख ...... (घनश्याम येनगे)

      बाबा आमटेंना ओळखत नाही असा सार्वजनिक जीवनातील व्यक्ती दुर्मिळच असेल. त्यांनी मुख्यतः कुष्ठरुग्णांसाठी उभारलेले आनंदवन, अशोकवन, सोमनाथ प्रकल्प; माड़िया गोंड या महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील भागातील आदिवासींसाठी 'हेमलकसा' येथे उभारलेला लोकबिरादरी प्रकल्प हे त्यांनी उभे केलेले संस्थात्मक काम आपण सगळे बऱ्यापैकी जाणून आहोत. बाबांचा ‘भारत-जोडो यात्रा’ आणि ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ यांच्यामधील सहभाग गांधींच्या 'रचनात्मक संघर्ष' या विचाराचे अनुकरण होता. बाबा कवी म्हणून प्रचंड प्रतिभाशाली होते. 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम', 'माती जागवील त्याला मत' हे बाबांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ज्वाला आणि फुले बद्दल तर असे म्हटले जाते की त्याचा इंग्रजी अनुवाद जर त्या वेळी आला असता तर त्या वर्षीचे नोबेल पारितोषिक बाबा आमटेंना मिळाले असते. बाबांनी 'उज्वल उद्यासाठी' हे तरुणांसाठी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिले आहे आणि 'सार्वजनिक संस्थांचे संचालन' हे छोटे पुस्तक संस्था कशा चालवाव्यात यावर लिहिले आहे. बाबा आपल्या ९३ वर्षांच्या आयुष्यात इतक्या आव्हनांना सामोरे गेले आणि प्रचंड असे मोठे काम उभे केले की त्यांच्या हयातीतच ते एक आख्यायिका बनले होते. या लेखात आपण आनंदवन स्थापन करण्यापूर्वी बाबांनी काय काय प्रयोग केले ते जाणून घेऊयात.
     नागपुरातील धरमपेठ या उच्चभ्रू भागातील मालगुजार कुटुंबात जन्मलेले बाबा आनंदवनापूर्वी पण फार विलक्षण आयुष्य जगले. एकाच आयुष्यात त्यांना अनेक आयुष्ये जगायची जिद्द होती आणि एकामागुन एक काम उभे करत त्यांनी ती पूर्ण केली असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्याच एक गितात ते म्हणतातच की ''फिरुनी मी तयार सर्व टाकुनी पसारा'' नविन कामांना नविन आव्हानांना नेहमी ते तयार असत.२६ डिसेंबर १९१४  रोजी जन्मलेल्या मुरलीधर देवीदास आमटे यांच्यावर त्यांची आई लक्ष्मीबाई यांचा खुप प्रभाव पडला. बाबा आमटे यांच्यात असणारी आक्रमक करुणा त्यांना त्यांच्या आईकडूनच वारसा हक्काने मिळाली आहे. बाबा तरुण असतानाचा काळ स्वातंत्र्य आंदोलनाचा होता. सुरुवातीला बाबा क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. बाबा पैलवान होते, व्यायामाने कमावलेले शरीर काहीतरी आव्हानात्मक करण्यास असुसले होते. बाबांना या काळात 'छोटा बजरंग' म्हणूनच ओळखले जाई. या व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातुनच हुतात्मा राजगुरु यांच्याशी त्यांचा संपर्क आला व मैत्रीही झाली. सॉण्डर्सचा खून केल्यानंतर राजगुरु हे भूमिगत असताना एकदा बाबांच्या घरी नागपुरला राहिले होते.
        वडीलांच्या इच्छेखातर बाबांनी नागपुरात वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. (खरे तर बाबांना डॉक्टर व्ह्ययचे होते. ते म्हणायचे माझ्या नावातच  एम. डी. आहे) आत्ताच्या छत्तीसगढ़ मधील दुर्ग या गावी बाबांनी सुरुवातीला वकिली केली. १९३९-४० ला ते वरोरा येथे वकिलीसाठी आले. याचे कारण तेथील त्यांची गोरजा येथील वंशपरंपरागत असलेली जमिन. त्याच्यावरही पोराने आता लक्ष ठेवावे ही वडिलांची अपेक्षा. त्या वेळी महात्मा गांधींचा आणि बाबांचा संपर्क आला. वरोऱ्यापासून ६० मैलांवर असलेल्या सेवाग्राम येथे गांधीजींनी सुरू केलेला आश्रम हा त्या काळात देशाच्या राजकारणाचं केंद्र बनला होता. गांधीजींनी कुटिरोद्योग, खादी, सूतकताई, बुनियादी शिक्षण अशा विविध कल्पना अमलात आणायला सुरुवात केली होती. त्या, त्या विषयातील तज्ज्ञ सेवाग्रामात येऊन राहू लागले. बाबांना या सर्वाची ओढ वाटू लागली. बाबांवर गांधीजींच्या विचारांची पकड बसली. बाबांच्या सेवाग्रामच्या खेपा वाढल्या. अंगावर खादी आली. घरात चरखा चालू लागला. एकूणच बाबांचं आयुष्य आरपार बदलून गेलं. अत्यंत ऐशोआरामी असलेली बाबांची जीवनशैली बदलून गेली. १९४२ च्या आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या केसेस बाबांनी मोफत लढवल्या. गुन्हेगारांची वकिली करून तुंबडया भरणारे वकील अनेक होते, पण श्रमिकांच्या हक्कांसाठी लढणारा वकील होणं बाबांनी स्वीकारलं.

       बाबांनी एक अनोखा प्रयोग त्या काळात केला. त्यांनी वामनराव स्वान आणि बाबूकाका खिस्ती या दोघा वकील मित्रांसोबत सहकारी तत्त्वावर वकिली व्यवसाय सुरू केला. तिघांचं मिळून एकच बँक खातं होतं; ज्यामधून तिघांपैकी कोणीही, कितीही पैसे केव्हाही काढू शकत असे. हे तीन मित्र मिळून फक्त गरीब अशिलांचीच प्रकरणं चालवीत असत. हा त्या काळातील एकमेव असा प्रयोग होता. मात्र बाबांना वकिलीच्या आपल्या व्यवसायात फार आनंद वाटत नव्हता. १२ तास मजूरी करुन जे कष्टकरी कमावतो तेच १२ मिनिटाची बड़बड़ करून वकील कमावतो हे समीकरण त्यांना अस्वस्थ करायचे. या काळात बाबा त्यांच्या गोरजा येथील वडीलोपार्जित जमिनीवर लक्ष घालत होते. गोरजा आणि आजूबाजूच्या गावखेडयातील दलित आणि एकूणच कष्टकरी वर्गाची दुरवस्था बाबांना जवळून अनुभवता आली. स्वत:ला उच्चवर्णीय समजणाऱ्यांच्या प्रचंड प्रतिरोधाचा सामना करत बाबांनी गोरजेतली विहीर हरिजनांसाठी खुली केली. त्यांना पक्की घरं बांधायला मदत केली. त्यांच्यासोबत ते जेवू लागले. भजनं म्हणू लागले. काठावर उभं राहून प्रश्नाचं तटस्थ निरीक्षण न करता थेट प्रवाहात झोकून देण्याच्या आपल्या स्वभावामुळे बाबा कष्टकऱ्यांमध्ये त्यांचाच एक भाग बनत मिसळले. बाबांचे हे वागणे मात्र त्यांच्या वडिलांना पसंत पड़ने शक्य नव्हते. त्यांनी बाबांचा विवाह करण्याचे ठरवले. परंतू फकीरी वा कलंदर वृत्ती स्विकारलेल्या बाबांनी याला काही मान्यता दिली नाही. लग्न करून संसारात पडत चाकोरीबद्ध आयुष्य जगावं लागणार, या नुसत्या कल्पनेनेही बाबांना गुदमरल्यासारखं वाटायचे. बाबांनी या काळात भगवे कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आपली दाढ़ी वाढवली व ईश्वराचा शोध घेत त्यांनी हिमालयातील अनेक आश्रम पालथे घातले. पण महंत, साधू यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यावर बाबांच्या लक्षात आलं की, आपला भविष्यकाळ असं गुहेत, समाजापासून, जनसामान्यांच्या दु:ख-वेदनांपासून दूर राहण्यात नाही. बाबा वरोऱ्याला परत आले; पण ते संन्याशाची वस्त्रं धारण करूनच जगत राहिले.

          मात्र साधना ताईंचे त्यांच्या आयुष्यात याच काळात आगमन झाले. एका नातेवाईकाच्या लग्नाची बोलणी करण्यास नागपुरच्या घुले यांच्या वेदशास्त्रसंपन्न कर्मठ कुटुंबातील घरी बाबांचे जाने झाले. त्याच घरातील त्यांची धाकटी मुलगी इंदु बाबांच्या मनात भरली. बाबांच्या घुले यांच्या घरातील चकरा वाढल्या इंदु यांचे पण बाबांवर प्रेम बसले. हे लक्षात आल्यास बाबांनी इंदुसाठी स्वतःच मागणी घातली. संन्यासी असणाऱ्या व ज्यांचा काही भरवसा नाही अशा बाबांशी इंदुने लग्न करू नये अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा होती. पण इंदु घुले या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या व त्यांचे यथासांग लग्न पार पडले. लग्नानंतर बाबांनी त्यांचे नाव साधना ठेवले व त्या त्याच नावानी पुढे ओळखल्या गेल्या. साधना ताईंनी पुढे आयुष्यभर बाबांची त्यांच्या प्रत्येक कामात भक्कम साथ दिली. या दोघांचे एकरूपत्व इतके होते की बाबांच्या कुठल्याही उपक्रमाच्या यशस्वीतेची चर्चा साधना ताईंशिवाय पूर्ण होत नाही.
      लग्नानंतर दोघेही वरोरा गावात राहु लागले. या काळात बाबांचे वकिलीत मन रमत नव्हते आणि वडिलोपार्जित जमिनीची देखभाल करणे ही आवडत नव्हते. त्यामुळे साधना ताईंशी बोलून त्यांनी ही दोन्ही कामे सोडुन दिली. गांधी विचारांची पुस्तके, खादी व चरख्याचा प्रचार-प्रसार करणे हेच त्यांनी आपले उपजीविकीचे साधन बनवले. बाबा एका नव्या प्रयोगाचा विचार याच काळात करत होते. कार्ल मार्क्स च्या विचारांचा काही प्रमाणात प्रभाव बाबांवर पडला होता. पण गांधींमुळे बाबा मार्क्सवादी बनले नाहीत.

            श्रमिकांच्या संघटना हे वर्गलढयाच हत्यार म्हणून वापरण्याऐवजी, श्रमाचं म्हणून जे स्थान आहे ते श्रमिकाला मिळवून देणं हे बाबांनी महत्वाचे मानले. हे विचार आमलात आणण्यासाठी बाबांनी काही एक करुण पाहण्याचे ठरवले.वरोरा गावाबाहेर एका स्मशानभूमीला लागून एक जुना बंगला होता. तो बंगला आणि ७ एकर जमीन बाबांनी या प्रयोगासाठी मिळवली. बाबांनी त्या बंगल्याच्या फाटकावर पाटी लावली- ‘श्रमाश्रम-मित्रवस्ती.’ सफाई कामगारापासून वकिलापर्यंत असे समाजाचे सर्व थर त्यांनी येथे एकत्र केले. श्रमजीवी आणि बुद्धिजीवी यांनी एकत्र बसुन समाजाचा व जीवनाचा विचार करावा हे बाबांना अपेक्षित होते. प्रत्येकानं आपली सर्व कमाई, मग ती रोजची, आठवडयाची, महिन्याची असो, एकत्र करायची, सर्वानी एकत्र राहायचं आणि एकत्र अन्न शिजवायचं, तिथं कुठल्याच प्रकारची जात-पात पाळायची नाही, अस्पृश्यतेला तिथं स्थान नाही असा दंडक होता आणि तसा व्यवहार होत होता. बाबांनी स्वत: लाकडं फोडणं, डोक्यावर भाजीची टोपली घेऊन बाजारात जाऊन भाजी विकणं, शेतकाम करणं, हिशेब ठेवणं इत्यादी पडतील ती  कामं तत्त्वनिष्ठेने केली. साधना ताईची त्यात पूर्ण साथ होती. त्यांनी स्वयंपाकाचं सर्व काम स्वत:कडे घेतलं. पडतील ती इतर कामंही केली. आजारी लोकांची शुश्रूषेपासून ते विहिरीतून कित्येक बादल्या पाणी काढण्यापर्यंतची कामं. बाबांच्या या प्रयोगाचे गांधीवाद्यांमध्ये खुप कौतुक झाले. पण वरोऱ्यातील लोकांनी मात्र याचे महत्व ओळखले नाही. साथ दिली नाहीच उलट हेटाळणीच केली. या प्रयोगतील लोकच वस्ती सोडुन निघुन गेले. साधना ताईही दरम्यानच्या काळात अजारी पडल्या. बाबांनी प्रयोग बंद केला.

          'श्रमाश्रमा’चा प्रयोग जरी तुटला तरी ‘श्रमातून निर्मिती होते’, ‘श्रमाने आत्मशुद्धी होते’, ही जीवनदृष्टी बाबांना या प्रयोगातून मिळाली. ‘‘अपयशातून दिशा निश्चित होत जाते आणि अपयश हे नेमक्या मार्गाकडे नेणारं वळणही ठरतं,’’ हा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. महारोगी सेवा समिती व आनंदवन स्थापन करन्यापूर्वीचा हा बाबांचा शेवटचा प्रयोग होता. बाबांनी उभे केलेले आनंदवनचे काम यावर पुष्कळ लिहून आले आहे परंतु आनंदवानापूर्वी बाबा कोण होते व त्यांनी काय कामे केली हे त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आपल्यापुढे यावे हा या लेखाचा उद्देश होता.

- घनश्याम येनगे
(प्रथम वर्ष , पदव्युत्तर  पदविका , रानडे इंस्टिट्यूट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे)
contact no.- 9028373273

Saturday, 3 February 2018

व्यवस्थेचे बळी...


मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत काही ना काही अघटित असे  घडत आहे. कुठे फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी मरतो आहे.... तर कोणी रेल्वे पुलाच्या चेंगरचेंगरी खाली जातोय.... अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे कोणी ख्यातनाम डॉक्टर ड्रेनेज मध्ये अडकून मरतोय ....कधी मंजुळा शेट्ये तर कधी अनिकेत कोथळे सरकारी अनास्थेचे बळी ठरतात ..इमारत कोसळून अनेक जीव दबले जातात ...नुकतेच झालेले अग्नी तांडव कमला मिल व भानु फरसाण अशा अनेक घटना काही लगतच्या दिवसांमध्ये सातत्याने घडतांना दिसत आहे.
       हे सर्व घटना घडत आहे पण आपली प्रशासन व्यवस्था मात्र अजूनही निद्रिस्त अवस्थेत   आहे. या जगात कोणीही किरकोळ नसतो. प्रत्येक जण हा  व्यैयक्तिक आयुष्यात कोणासाठी तरी एक आधार असतोच किंवा  महत्वाचा असतो. एक गेला/दोन-चार  गेलेत तर आपण ह्या घटना किरकोळ समजतो.  किरकोळ संख्या असली म्हणजे इतना तो चलता है... ये तो होता है....  याप्रकारे काना डोळा करून विषय संपवला जातो . ही   वृत्ती सोडून व्यवस्थेने याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. 
     
      काल परवा झालेल्या मुंबईतील आगीच्या दुर्घटनेमध्ये सुरक्षा नियमांची बेपरवाई समोर आलीच. जबाबदारीचा असा  चालढकलपणा हा पुढील अनेकांच्या मृत्यूचे कारण ठरतो.  अशा प्रकरणात  गरीबांचे नाहक बळी जात असतात.  मध्यंतरी एक व्हिडियो  माकड झाडाला बांधून त्याला  अमानुषपणे मारहाण  करतांनाचा  प्रसारीत झाला होता. जर प्रशासनाला माणसांची किंमत  नसेल तर माणसे सुद्धा प्रशासनासारखे वागुण जनावरांवर अत्याचार करतांना दिसतीलच. सांगलीतील अनिकेत कोथळे प्रकरण ह्याच प्रकारात मोडणारे ठरेल. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मृत्यू किती स्वस्त झाला आहे हे अलीकडच्या घटनांवरून समजते.  आपण सुजलाम सुफलाम महाराष्ट्र बद्दल नेहमी ऐकतो.  पण ज्यांच्या कुटुंबावर ही  शोककळा  पसरली आहे त्यांचे काय....?  आता पर्यंतच्या घटनांवरून काही तरी धडा घेऊन मायबाप सरकारने  कारवाही आणि कार्यवाही याबाबत कठोर पाऊले उचलली पाहिजेत . वैयक्तिक हितसंबंध हे बाजूला ठेऊन आपण समाजासाठी , समाजाच्या सेवेसाठी सत्तेमध्ये आलो आहोत, हे भान राहिल्यास हाती असलेली व्यवस्था ही  नक्कीच सुरळीत होईल.
           “रोज मरे त्याला कोण रडे’ अशी सरकारी यंत्रनेची स्थिती झाली आहे. मग  कालचे ८४  वर्षीय धर्मा पाटील हे सुद्धा याच सरकारी अनास्थेचे बळी ठरले आहेत. सर्वसामान्य माणूस असाही दररोज धडपडत जीवन जगतच आहे, त्यांची दुःखे,गरीबी,बेकारी दूर करणे सोडून सरकार सर्वसामांन्याची गरीबी, बेकारी ही त्यांना संपवून तर हटवत नाही ना याच उत्तर आता शोधावे लागेल...?



अमित येवले.
बी.ई.(इलेक्ट्रिकल)
एम.ए.(लोकप्रशासन)

Monday, 15 January 2018

रॅंडम विचारांची कंडम साखळी....(अभिषेक राऊत)

      आज तसं बऱ्याच दिवसांनी पेन हातात घेतलंय. काय लिहावं याबद्दल काहीही कल्पना नाही. जितका कोरा कागद तितकंच मनही कोरं. विषय,विचार मनात येतच नाहीयेत. विचारांविना शब्दांनाही फारशी ताकद नाही. अधिक सामर्थ्यवान कोण? विचार की शब्द असले प्रश्न मनात घुटमळत राहतात. विचारच सामर्थ्यवान. शब्द तर केवळ एक माध्यम, विचारांना व्यक्त करण्याचं. खरंतर आम्ही खेळायला हवेत विचारांचे खेळ. पण बऱ्याचदा आम्ही शब्दांचेच खेळ खेळतो आणि त्यातच गुरफटून राहतो.
      सामर्थ्यवान कोण हा अख्या  मानवजातीचा आवडता प्रश्न. ह्याचं उत्तर शोधण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजेच मानवजातीचा इतिहास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अर्थातच जे सामर्थ्यवान ठरतात तेच इतिहास लिहितात आणि त्यांना मानवेल असाच लिहितात. म्हणून मग सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावूनही राम पूज्यनीय ठरतो आणि बघताबघता रावण खलनायक ठरवला जातो. इतिहास लिहिताना तेवढी काळजी प्रत्येक विजेता घेतोच मग तो भारतातला असूदे किंवा परदेशातला.
                     
        पण भारतासारख्या भावनाप्रधान देशात इतिहास लागतोच कारण तो आम्हाला महापुरुष पुरवतो. या महापुरुषांत राम, कृष्ण , शिवाजी , महाराणा प्रताप , ते गांधी , नेहरू , आंबेडकर असे सगळे येतात. महापुरुषांच काय करायचं हे आम्ही फार आधीच ठरवलंय. आम्ही शक्यतो त्यांचे पुतळे बांधतो. विमानतळ, रेल्वे स्थानक यांना त्यांची नावं देतो, शक्य झाल्यास त्यांच्या नावाने आम्ही काही योजना घोषित करतो, त्यांच्या नावाने आम्ही मतं मागतो , त्यांच्या नावाचे पुरस्कार देतो, त्यांच्या स्मारकासाठी समुद्रात , बेटांवर , मिलमध्ये जागा देतो, देवघरात त्यांचे फोटो ठेवतो , वर्षातून दोन जयंत्या , पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे असे जे त्यांचे विचार त्यांना सोयीनुसार आपल्या शब्दांत मांडून आपल्या भविष्याची सोय करून ठेवतो. शक्यतो आम्ही महापुरुष वाटून घेतो. हा आमचा तो तुमचा असं. मग या महापुरुषांच्या विचारांवर चर्चा, मतभेद, वाद-विवाद होण्यापेक्षा त्यांच्या अनुयायांमध्ये मारामारी होणं जास्त सोयीस्कर असतं.
           पूर्वी महापुरुष होणं जरा कठीण होतं. पण आजकाल ते सोप्पं झालंय. अनुयायी आजकाल भाड्यानेही मिळतात. विचार सामर्थ्यवान असतात पण आजच्या धावपळीच्या युगात विचार करण्यासाठी कुणाकडे फारसा वेळ नसतोच. त्यापेक्षा तोडफोड आणि मारामारी करून जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. शिवाय आजकाल मीडियासुद्धा सगळीकडे हजार असतो. त्यांच्या लेखी ‘NEWS value ” ला महत्त्व असतं . तात्त्विक विरोधापेक्षा चार बसेस जाळल्यात तर त्याची “NEWS value” साहजिकच जास्त असते. त्याला जास्त प्रसिद्धी मिळते . जर तुमच्या शहरात, गावात तुम्ही बसेस जाळू शकत असलात आणि कामकाज बंद पाडू शकत असलात तर तुमची ‘वट ‘ वाढते . तुम्हाला लोक आधी ‘दादा’ , मग ‘साहेब’ आणि मग ‘सरकार’ बोलू लागतात. तुमच्याही नकळत तुम्ही ‘सामर्थ्यवान’ होऊ लागता. कारण शेवटी ‘सामर्थ्यवान कोण’ हाच प्रश्न असतो. कुठल्याही विषयाविना गुंफलेली ही रॅंडम विचारांची कंडम साखळी पुन्हा सुरुवातीलाच येऊन थांबते.








-अभिषेक राऊत.

Friday, 12 January 2018

आठवण....( अमोल अवचिते )

   
    सोडून जाताना एकदा तरी सांगायचं होतस...
    काही व्यक्ती अशा असतात की त्यांची साधी आठवण आली तरी स्तब्ध व्हायला होत.कधी त्या व्यक्तीच्या आठवणीत रमायला होत कळतही नाही.
   अशाच प्रेमळ व्यक्ती आपल्याला त्यांचा लळा लावून जातात. काही वेळेस आठवणीत रमून गेल की नकळत डोळ्यातुन पाणी ही येत...कधी अश्रू व्हायला लागतात समजतच नाही.. जुने फोटो पाहावे तरी काळजात धस्स होत..कारण नुसते फोटो पाहिले तरी मन व्याकुळ होत...
        अशी ती माझा आयुष्यात येऊन  मला भावनिक व्हायला शिकवून गेली . दुसरं कोणी कितीही लांबच असो की जवळच आपण मात्र नेहमी हसत राहायला हवं ...असच ती नेहमी सांगत असायची. मी तसा तिच्या जवळचा होतोच ..आई सारखी माया द्यायला ती कधीच कमी पडली नाही..कधी रागवलीही नाही. ज्या ज्या वेळी मी समोर असेल त्या वेळी तिचा आनंदच वेगळा असायचा ..हो तो आनंद आजही  जशाचा तसा माझा समोर उभा राहिलाय. तो  माझ्याकडे पाहून आता हसतोय बहुतेक ....का तर आता तो तिच्या सोबत निघून गेलाय ना...म्हणून कदाचित तो खुश असावा...मला मात्र हसून हिनावतो आहे..
           कधी कधी वाटत का गेली असेल ती मला सोडून ..?का तिचं प्रेम नव्हते का माझ्यावर ..?? ती गेली त्या दिवशी किंवा त्या आदी मी तिच्याशी कधी बोललो हे सुद्धा लक्षात
नव्हते...अस का झालं असावं..का ती जाणार होती म्हणून मला ती भेटली नव्हती...हो हे खरं असेल कदाचित कारण मी तिला जाऊच दिल नसतं ना....आमचं ठरलं होतं,की आयुष्यभर सोबत राहायचं...म्हातारी झाल्यावर माझाच आधार होता तिला....
         किती स्वप्न अधुरे सोडून गेलीस ग तू ?? मला अधिकारी होताना पहायचं होत ना तुला..?? मी कसा साहेब म्हणून मिरवून घेईल हेही पहायचं होत ना ..?? न सांगता गेलीस याच दुःख आहेच ..! पण कधी कधी वाटत की गेलीस ते बर ही झालं ..कारण तू गेल्यानंतर तुझी किंमत मला तर माहीत होतीच पण ती बाकीच्या लोकांना ही समजली...तुला होणारा त्रास मला कधीच मान्य नव्हता.मात्र होणारा त्रास कधीच कमी करता आला नाही याचं दुःख कायम मनात राहिलं आहे.
           
                 
               ज्या दिवशी तुझा अपघात झाल्याची बातमी ऐकली त्या वेळी खरं तर रागच आला होता मला...का गेली होतीस रोडला?? तुला गाड्या बघून  रस्ता ओलांडता येत नाही माहीत  होत ना  मग तरी सुद्धा गेलीस ...म्हणून याची शिक्षा तुला व्हायला हवी असच मला वाटलं...म्हणून मी ही निवांत राहीलो.. गादीवर आडवा पडून टीव्ही पाहण्यात मी रमलो होतो ..त्यावेळी का वाटलं नसेल की तुला अपघात झालाय त्यात तुला खरंच लागले असेल  का?? कोणत्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेत याची साधी चौकशी सुध्दा केली नाही मी. जेवण करून झोपताना एक फोन केला तेवढा सोनीला, की कुठे घेवून गेलीस तिला म्हणून आहे का जिवंत अस फक्त नेहमी प्रमाणे रागात बोललो ..पण यावेळी  तु जीवंत नाहीस अस सोनी बोलली ग...न मी हसून ही बोललो कि बरं  झालं असच पाहिजे तिला...सर्वांची काळजी करते. पण स्वतःची काळजी घ्यायची म्हटले की नको वाटत तिला.....सोनी मात्र शांतपणे ऐकत होती ...माझं बोलणं संपण्याची वाटच बघत होती....माझं बोलणं संपते ना संपते तेच ती बोलली डॉक्टर  बोललेत  की सकाळी तुम्हांला डेड बॉडी मिळेल ..उद्याच अंत्यसंस्कार करावे  लागतील ...अस सांगताच मी हसलो  मात्र त्याच वेळी जोराचा हंबरडा सोनी नी फोडला अमोल खरंच रे आपली काकू आपल्याला सोडून गेली.    
           डॉक्टर बोलले, आणायला थोडा उशीर झाला नाही तर तुमचे पेशंट वाचले असते.. याला दोषी तूच होतीच असच वाटलं मला कारण तू दिवसभर शेतातून काम करून आली होतीस,दिवसभर उपाशी होतिस तुला घरात बसता येत नव्हत का ??.पण गरिबी पुढे आरामला कुठे जागा असते?? घरातील पीठ संपले होते म्हणून तू दळण आणायला गेली होतीस हे नंतर समजले... रात्रीही उपाशी झोपली असतीस तर बिघडले कुठे असते...?? असच मनाला कुठे तरी वाटत राहतं.. पण तुला सांगायचं राहवून गेलं की तू जाण्याला मीच जबाबदार आहे. तुला रिक्षाने धडक दिली याची पहिली बातमी मलाच समजली होती .मी मात्र तुलाच दोष देत बसलो....मला माफ कर मी तुला वाचवू शकलो नाही..अजूनही तू दिलेला मायेच्या ठेवा मी जपून ठेवला आहे.


5






             -  अमोल अवचिते
             (कार्याध्यक्ष -रयत
                           फाउंडेशन)

ऊर्जा वास्तुतील सकारात्मकतेची....(ऋतुजा हगवणे)


  आजच्या जगात जगण्यासाठी पैसा, घर आणि अजून काही उपभोग वस्तुंची आवश्यकता असते. पण यापलीकडे आज एका गोष्टीची नितांत गरज आहे ती म्हणजे 'सकारत्मक्ता'. मग ही सकारात्मक्ता पुस्तकातून, व्यक्तितून, अनुभावातून तर  काही काही वास्तू यांमधुन येत असते आणि त्यात जर त्या पुण्यातील असतील तर  "क्या बात..... नाही का..."
           फर्ग्युसन कॉलेज मधील किमयाचा कट्टा, रानडे च्या दगडी भिंती, गुडलक आणि जे एम रोड, fc रोड , हि ठिकाण नेहमीच मला positivity देतात...  खुप मोठमोठया लोकांचा वावर या ठिकाणी झालाय.  त्यामुळेच की काय माहित नाही...पण मला खूप आवडतं येथे ...रमता येत येथे..... विचार करता येतो...स्वतःला अनुभवता येत...

                          -ऋतुजा हगवणे, रानडे इंस्टिट्यूट.

-------------------------------------------------------------------

राष्ट्रिय युवा दिन......(स्वामी विवेकानंद जयंती विशेष)

    
           "उठा ,जागे व्हा आणि ध्येय प्राप्त  होत नाही तोपर्यंत थांबू नका...."असा संदेश देणारे युवकांचे प्रेरणास्रोत व समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिवस. या महापुरुषाचा जन्मदिवस आपण राष्ट्रिय युवा दिवस म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी१८६३ रोजी कोलकात्यात झाला.
   या महान पुरुषाने सुप्त अवस्थेत असल्याला समाजाला नवी ऊर्जा , दिशा,साहस देण्याचे काम केले. त्यांच्या ओजस्वी वाणीने भारतात व भारताबाहेर अनेक लोकांना मोहित केले. कोणत्याही देशाची खरी ताकद ही त्यांच्या देशाचे युवक असतात, हे त्यांनी नेहमी पटवून दिले. त्यांच्या विचारांनी युवाशक्ती ही नेहमी बोध घेत राहिली. 
     अमेरिकेत `भगिनींनो आणि बंधूंनो’ या शब्दांनी सार्‍या मानवजातीला साद घलणारे स्वामी विवेकानंद एकमेव वक्‍ते होते. त्यांनी त्यावेळी सांगितलेले विचार हे आज सुद्धा तेवढेच काल सुसंगत वाटतात. आयुष्यभर सकारात्मक विचारांची पेरणी केलेल्या या महापुरुषाला विनम्र अभिवादन..!
                                      
-------------------------------------------------------------------