Sunday, 31 December 2017

खान्देश जंक्शन @10 years , नारायण पेठ, पुणे


  खान्देशातील भुसावळ शहरात राहणारा मी. सुरुवाती पासूनच व्यवसाय करायचे स्वप्नं उराशी बाळगून होतो.. त्या स्वप्नपूर्तीसाठी मी थेट ऐतिहासिक आणि साहित्यिक वारसा लाभलेली पुण्यनगरी म्हणजे पुणे शहर गाठलं... स्वतःची अशी खाद्यसंस्कृती जपणारं हे शहर त्यात रस्तोरस्ती  हॉटेल्स आणि  खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स... आणि अशा परिस्थितीत स्वतःच्या गावाची म्हणजे खान्देशाची चव पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळत ठेवायची म्हणजे आव्हान होतं माझ्यासाठी.. पण आव्हान पेलायच ठरवलं सुरुवातीला मिळेल ती काम करत गेलो आणि मग छोटेखानी हॉटेल सुरु केलं... २००८ मध्ये मी खान्देश जंक्शन या नावाने खास खानदेशी चवं असलेलं जेवण देणारं हॉटेल सुरु केलं.... कमी तिखट आणि गोडधोड खाणाऱ्या पुणेकरांच्या पसंतीस तिखट खान्देशी जेवण उतरणं म्हणजे आव्हान होतं. माझ्यासाठी पण पुणेकरांच्या खवय्येगिरीवर तितकाच विश्वास होता आणि भरभरून दाद देण्याची वृत्ती हि माहित होती...
       सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण आत्मविश्वास आणि जिद्द मनात कायम होती... अडचणींवर मात करत शेतातल्या ताज्या भाज्या खास भूसावळवरून मागवून मी वांग्याचं भरीत, शेव भाजी, वरण बाफले(वरण बट्टी), पातोडी भाजी असे विविध प्रकार देण्यास चालू केले... खाद्यप्रेमींच्या पसंतीला हळू हळू खान्देशी चव पसंत पडू लागली आणि या व्यवसायात जम बसायला लागला... फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर ओळख झालेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातील खवय्यांनी माझ्या हॉटेलला भेट दिली. इथले पदार्थ चाखले आणि भरभरून दाद दिली... आजही कोणी पुण्यात आलं की आवर्जून माझ्या या छोटेखानी हॉटेलला भेट देतात. 
खानदेशी
       मला सांगायला आनंद होतोय की, १ जानेवारी २०१८ ला माझे खान्देश जंक्शन हे हॉटेल ९ वर्ष पूर्ण करून १० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पुण्यनगरीतील तसेच पुण्यातील खांदेशी मित्रांनी तसेच फेसबुकवरील महाराष्ट्रातील  माझा मित्र परिवार यांचे मी आभार मानतो कारण माझ्या स्वप्नपूर्तीस त्यांचा हातभार लागला आहे, ज्यांच्या पसंतीस खान्देशी पदार्थ उतरले आणि मला भरभरून पसंतीची पावती दिली.... ९  वर्षातील आपले हे प्रेम आणि स्नेह असाच वाढत राहो, आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम राहोत हिच आपणास विनंती....
नविन वर्ष आपणास सुखसमाधानाचे जावो आणि आपली भरभराट होवो हीच सदिच्छा...




- नीलेश चौधरी. (संचालक, खान्देश जंक्शन)

नवे वर्ष अपेक्षांचे की जबाबदारीचे.....??(अमोल अवचिते)


     "काळ कधीही कोणासाठी थांबत नसतो....तो एकतर आपल्या पुढे , नाहीतर सोबत असतो...". आज वर्षाचा शेवटचा दिवस, त्यामुळे प्रत्येक जण हा गतवर्षाचा आढावा घेण्याचा काही तरी प्रयत्न करणाच व पुढील वर्षाच्या इच्छा/अपेक्षा काय असणार याच एक गणित तयार करणार.  म्हणजे आपण एक विचार करू की एखाद्या स्त्रीला दिवस गेले की ,घरामधील प्रत्येक व्यक्तीला आनंद होतोच. तिच्या गर्भात निर्माण झालेला गर्भ हा मुलांचा असला पाहिजे अशी मानसिकता साहजिकच असते. कोणाला मुलगी हवी असते तर कोणाला मुलगा. जो नैसर्गिकरित्या गर्भ निर्माण झालाय त्याला न  भावना ,न संवेदना. मात्र त्याच्या कडून अपेक्षा की बाहेर येताना मुलगाच होऊन ये ..किंवा मुलगीच होऊन ये ....
          खरंच आपले आयुष्य हे पण, नव्याने या जगात प्रवेश करत असतानाच लोकांच्या अपेक्षांनीच  निर्माण झालेले असते. आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कोणाच्या ना कोणाच्या अपेक्षावर चाललेले असते. रोज नविन येणारा दिवस कोणाच्या तरी मर्जीनेच जगायचा की  स्वतःच्या इच्छेने, आनंदाने??
     येणार नवं वर्ष हे इंग्रजी का असेना पण आपण त्याच्या स्वागताला सज्ज झालो आहोत. नवी  ध्येय ,नवी दिशा,नवी आकांक्षा,नवा उत्साह,नवा उपक्रम आणि नवा निश्चय हे सर्व घेऊन आपण नव्याने नव्या वर्षात प्रवेश करतोय....  येणार प्रत्येक दिवस आनंदानेच जगणार आहोत. नव्या वर्षाचा नवा दिवस आपल्यासाठीआनंदच घेऊन येणार आहे हे पक्क मनाशी ठरवून आपण त्या दिवसाला सामोरे जावूयात. रोजच काही तरी नवं शिकणार आहोत..नव्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. याच भान आपल्या हवंच .

      गेलेला प्रत्येक दिवस इतिहास जमा होतो.त्याच बरोबरीने भूतकाळात ही जमा होतोच. आता आपण नव्याने भविष्य काळाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. आता फक्त भूतकाळ हा आपला इतिहास केवळ आपल्या साठी अनुभव व एक धडा  म्हणून राहिला आहे, जो आयुष्यभरासाठी पुरणार आहे. नव्या आयुष्यात आपण भूतकाळाचा न भविष्याकाळाचा विचार करायचा , फक्त जगायचं ते वर्तमान काळातच, आपण हसतो ते फक्त आता, म्हणजे वर्तमान काळातच... २०१८ हे  येणारे नवे वर्ष आनंदाचे, चैतन्याचे, प्रेमाचे, भरभराटीचे व एक सुवर्ण संधीचे म्हणूनच राहील अशी अपेक्षा करुयात. सर्वांना नव वर्षांच्या मनापासून  हार्दिक शुभेच्छा!।।






-अमोल अवचिते.

Friday, 29 December 2017

'एमपीएससी-मित्र....' कार्यक्रमाचे आयोजन

स्पर्धा परिक्षेतील भावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना राजीव तांबे.

पुणे प्रतिनिधी:- "सकारात्मक विचारधारा ही माणसाच्या यशाची खरी सुरूवात असते. नेहमी मी हे करणारच असा भाव आपण ठेवला पाहिजे. तेव्हा आपण या स्पर्धेच्या जगात कायम पुढे असू. त्यामुळे नेहमी सकारात्मक रहा",असे मोलाचे मार्गदर्शन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राजीव तांबे यांनी केले.
          'एमपीएससी-मित्र' ह्या नितीन प्रकाशन व पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या क्रायक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एमपीएससी परिक्षेमध्ये यशस्वी वाटचाल करणाऱ्या प्रथमेश घोलप आणि विवेक धांडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

विवेक धांडे यावेळी मार्गदर्शन करतांना
कार्यक्रमाचे अध्यक्ष तांबे यांनी यावेळी बोलतांना सांगितले, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय योग्य ठेवली पाहिजे.आपल्या यशाची पद्धत आपण स्वतः शोधली पाहिजे. वाट आपोआप तयार होत असते. प्रत्येक गोष्टीला स्वीकारा, अडचणी नक्की येणार , पण त्यावर मात करने हे आपल्या हातात आहे. ह्या सर्व प्रवासात तुम्हाला नकारात्मक लोकही भेटतील, त्यांना एक 'स्माईल' दया, त्यांच्याशी कृतीतून बोला आणि आपल्या कामाला लागा. तांबे यांनी त्यांच्या आगळ्या-वेगळ्या शैलीतून विद्यार्थ्यांना  हसत खेळत अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

Thursday, 28 December 2017

'लढेंगे जितेंगे....'(रशीद मनियार)


  •      "जीने मला   लढायला आणि बोलायला शिकवलं त्या छात्रभारतीचा कार्यकर्ता असल्याचा मला सार्थ अभिमान आहे ."  गेली ३५ वर्षे  छात्रभारती गोर-गरीब ,कष्टकरी विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून महाराष्ट्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर छात्रभारतीने लढा उभारला आहे आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा पवित्रा अगदी आक्रमक  पण संविधानाने दिलेल्या मार्गाने केलेला आहे. आजपर्यंत माझ्या सारख्या हजारों विद्यार्थ्याना जे काही संविधानिक बळ, स्थैर्य मिळाले ते फक्त आणि फक्त छात्रभारती मुळेच.
आज मी जो काही आहे, जे काही बोलतो ते फक्त छात्रभारतीमुळे. माझ्या विचाराची दिशा पक्की केली ती देखील छात्रभारतीने. आज कोणत्याही स्टेजवर आपला मुद्दा पटवून देतो तो छात्रभारतीच्या माध्यमातून होत असलेल्या अभ्यासमंडळांच्या साहाय्याने खऱ्या अर्थाने  मला विवेकशील  माणूस बनविण्याचे काम केले ते  छात्रभारतीने. छात्रभारतीने माझ्यावर इतके उपकार केले आहे की ते मी कधीच विसरू शकत नाही. नेतृत्व,वक्तृत्व आणि आपुलकी ही सारी कार्यपद्धती छात्रभारती कडून शिकलो,  महाराष्ट्रभर असलेले कार्यकर्ते जेव्हा आपुलकीने आणि तेवढ्याच काळजीने,पोटतिडकीने आपली विचारपूस करतात तेव्हा भरून पावल्यासारखं वाटतं. आज छात्रभारतीच्या माध्यमातून मी कोणाचा भाऊ,कोणाचा मुलगा ,कोणाचा मित्र झालो आहे. 
        अनेक लोकांशी रक्ताचे नाही पण त्याहून अधिक महत्वाचे नाते निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील असा एकही जिल्हा नाही जिथे माझ्या ओळखीचा एक कार्यकर्ता नाही, छात्रभारतीने खऱ्या अर्थाने नेतृत्व करण्याची संधी दिली. अनेक आंदोलने,मोर्च्यांमध्ये सहभागी झालो.अनेक गोष्टींविषयी माहिती मिळत गेली. खऱ्या अर्थाने माझ्यातला कार्यकर्ता जिवंत करण्याचं काम छात्रभारतीने केलं आहे.
        खऱ्या अर्थाने समतावादी बनवण्याचं काम छात्रभारतीने केलंय.शिक्षण,सहभाग,समता या त्रिसूत्री नुसार छात्रभारतीचं काम चालतं. १८ डिसेंबर २०१७ रोजी छात्रभारतीला स्थापन होऊन ३५ वर्षे होत आहेत. शिक्षणासाठी छात्रभारतीचा संघर्ष अविरतपणे चालू आहे. आजपर्यंत छात्रभारतीचा भाग झालेल्या सर्व जिंदादील कार्यकर्त्यांना माझा सलाम....!
"छात्रभारती की खास बात....लढाई पढाई साथ साथ"
लढेंगे जितेंगे. 
                                                       आपलाच साथी
                                                       रशीद मनियार .
                                                     (९६६५८५४३१५)

Sunday, 24 December 2017

'दिवस सुट्टीचा.....' (सविता शिंदे)

     सध्या धकाधकीच्या जीवनात गरजेच्या बऱ्याच कामांसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे अशा कामांसाठी मिळतो तो सुट्टीचा दिवस म्हणजे अर्थातच 'रविवार'. याच दिवसावर आपण घरातील अनेक राहिलेली कामे ढकलतो. मात्र ठरविलेले एक असते आणि वेगळीच कामे करू लागतो. जसे की, कपाट आवरायला घेतल्यावर मधेच एखादा जुना अल्बम खुणावतो. टीव्हीवरील गाणे ऐकण्यात कसा वेळ जातो हे देखील समजत नाही. बघता बघता अर्धा दिवस कसा सरतो हेच कळत नाही. साहजिकच जेवणाच्यावेळी नाष्टा केला जातो. खाल्ल्यानंतर जरा निवांत पडावे वाटते आणि कामे तशीच पडून राहतात आणि मग चिडचिड सुरू होते.
          दरदिवस शरीराला धावपळीची सवय असल्यामुळे सुट्टी असलेल्या आनंदावर पाणी फिरते. पण दररोज धावपळ करणे हे काही जीवन नाही. खरंतर आपण सुट्टी उत्तमप्रकारे व्यतीत केलेली असते. त्यात काहीतरी नावीन्य असते. पण याकडे सरळ दुर्लक्ष करून उरलेल्या सुट्टीच्या आनंदात विरजण घालतो. याउलट त्यातून मनाला आनंद मिळाला. शरीराला थोडासा आराम मिळाला. एखाद्या दिवशी कामे वेळेच्या वेळी नाही झाली तर काय फरक पडतो? आपण माणसे आहोत यंत्र नाही. त्यामुळे फक्त काम आणि काम म्हणजेच जीवन नाही. आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे, आवडत्या व्यक्तींशी गप्पा मारणे, आवडत्या वस्तूंवर ताव मारणे. या गोष्टींनाही महत्व दिले तर निश्चितच आपले अनमोल जीवन जगण्याचा आनंद द्विगुणित होईल.

                                                -  सविता शिंदे .

'आगमन नव्यावर्षाचे......' (प्रसाद भणगे)



  "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी " याप्रमाणे या वर्षाच्या सरतेशेवटी काही गोष्टी लक्षात ठेवण्या जोग्या नक्की असणार, तसे पहिले तर अनेक गोष्टींचे  साक्षीदार म्हणुन हे २०१७ वर्ष राहिले आहे. या वर्षाने ही आपल्याला बरेच से सुख-दुःख, यश-अपयश दिले असणार, काही लोक सोडून गेले असणार , तर नवीन काही लोक जोडले ही गेले असणार. प्रत्येक वर्षाप्रमाणे हे वर्ष देखील आपले ३६५ दिवसांचा कालखंड पूर्ण करून आपल्या सर्वांचा निरोप घ्यायचा तयारीत आहे आणि अशा वेळेस आता आपण उठून एका नव्या उमेदीने अणि उत्साहाने २०१८ च्या स्वागताच्या तयारीला लागले पाहिजे.

   या नव्या वर्षांसोबत आपण नवी ध्येये, नवी क्षितिजे गाठण्याची मोर्चेबांधणी करायला हवी. यश-अपयशाचा विचार न करता सकारात्मकते ने येणार्‍या प्रत्येक आव्हानाला आपण सामोरे गेले पाहिजे.

    जगातील अनेक मोठ्या गोष्टींची सुरूवात ही छोट्या-छोट्या गोष्टीच्या प्रयत्नांमधून झाली आहे, त्यामुळे आपणही आपल्या जीवनात अनेक गोष्टींची सुरूवात ही लहान-लहान ध्येयांमधुन करायला हवी. या सर्व प्रयत्नांमध्ये जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. आपले ध्येय गाठण्यासाठी  परिश्रम, योग्य मार्गदर्शन, सकारत्मक विचार व आत्मविश्वास यांच्या जोरावर आपण नक्कीच आपल्या कार्यात यशस्वी होऊ शकतो.

प्रसिद्ध व्याख्याते 'शिव खेरा' यांचे हे वाक्य कायम लक्षात राहण्याजोगे आहे. "जितने वाला कोई अलग काम नही करता, वो अपना काम अलग ढंग से करता है". तरी आपणा सर्वांना हे येणारे नवे वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा...!!







-प्रसाद भणगे, पुणे.

Monday, 18 December 2017

आज देशात सर्वत्र जल्लोष.... (निमित्त मात्र गुजरात निवडणूक निकालाचे)

        गुजरातमध्ये भाजप सत्तेत येईल? असाच कौल संपुर्ण एग्झिट पोलने दाखवल्याने संपुर्ण देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. या निकालाने भारतीय राजकारणाला एक वेगळे वळण लागणार आहे. दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची केल्याने नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी या नेतृत्वाच्या राजकीय भविष्याची चिंताही वाढवणारी आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या या निवडणूक निकालाचे महत्व वाढले आहे.

        ज्या गुजरात मॉडेलच्या धरतीवर देशात भाजपाने 2014 साली स्पष्ट बहूमत मिळवून सरकार स्थापन केले. त्यानंतर इतर राज्यातही आपले पाय रोवले. त्याच गुजरात मॉडेलवर विरोधकांसह अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने भाजप अडचणीत आला होता. परंतु सर्वच एग्झिट पोलने भाजपच सत्ताधीश होणार असा अंदाज व्यक्त केल्याने भाजपच्या कोमजलेल्या आशा पल्लवित झाल्या. तर काँग्रेस पक्ष सत्तेच्या जवळ जाईल असा अंदाज पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानानंतर याच एग्झिट पोलने काढले होते. पण दुसऱ्या टप्प्यातील एग्झिट पोलच्या अंदाजाने हे सगळे अंदाज बदलले. त्यामुळे काँग्रेसच्या नवसर्जनाची उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यातच हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या तीन त्रिकूटाचा फायदा कोणाला होईल. याचीही चर्चा होताना दिसते.

        ज्या त्रिकूटांनी गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण केले. त्या तरुण नेतृत्वाला लोक आपलसं करतात का? हा खरा प्रश्न आहे. जर असे झाले तर त्याचा फायदा काँग्रेसला होणार की, मत विभाजनाचा फटका बसेल? विशेष म्हणजे गुजरातमध्ये भाजप विरोधी वातावरण निर्माण होण्यास सत्ताधारी पक्षाची नाराजी, नेतृत्वांतर्गत वाद, दलितांवर अत्याचार आणि पाटीदार आंदोलन इत्यादी घटना ह्या कारणीभूत होत्या. त्यामुळे परिस्थिती बदलण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याच भूमीत 50 सभांचा चंग बांधला व गुजराती लोकांना आपलसं करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. तर त्याच पद्धतीने विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल करीत भाजपची चांगली दमछाक केली. परंतु कोणत्याही पक्षांनी मुलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली नाही. तर ज्या गुजरात मॉडेलवर हे सगळ घडलं त्या गुजरात मॉडेलची चर्चा सुद्धा या निवडणुकीत कुठेही प्रक्रर्षाने झाली नाही. भाजपने यावर चर्चा करुन आपला वेळ खर्च केला नाही. तर विरोधकांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने विकासाच्या मॉडेलची चर्चा होण्याऐवजी व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपाच्या चर्चा भाजप व काँग्रेस पक्षांच्या नेत्यांकडून झाल्या. त्यामुळेच ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहूल गांधी यांच्या श्रेष्ठत्वाची झाली आहे.

  मोदींनी "सबका साथ सबका विकास" या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करत, गुजराती अस्मिता, हिंदूत्व यासारखे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले. तर राहूल गांधींनी नोटाबंदी, जीएसटी, जातीय राजकारण आणि मोदी व केंद्रसरकारवर आरोप करत निवडणूक प्रचार केला. याचा कुणाला किती फायदा होईल हे कळेलच...पण निवडणुकीचा प्रचार मात्र व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपाच्या पातळीवर येऊन पोहचला होता. असे असले तरीही या निवडणुकीत काँग्रेसने जातीय समीकरणे मांडून भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर भाजपाने काँग्रेसवरच पलटवार करीत आपल्या हिंदूत्वाच्या मुळ अजेंड्याकडे लोकांचे लक्ष वळवले. आणि काँग्रेसचा वाढता प्रभाव जाणीवपुर्वक कमी करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरीही जातीय समीकरणाचा प्रभाव हा व्होट बँक म्हणून एकत्र आल्यास हे चित्र काहीसे वेगळे दिसेल. तसेच आदिवासी व शहरी भागातील मते ही भाजपाला आपल्याकडे वळवण्यात किती यश येईल व ग्रामीण मतदार कोणाच्या झोळीत आपली मते टाकेल? या सगळ्यावर खरे तर काँग्रेस व भाजपच्या जागांचे गणित ठरेल...

        या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे बुथ मॅनेजमेन्ट होय. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आल्यास याचे सर्व श्रेय हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना व बुथ मॅनेजमेन्ट करणाऱ्यांना द्यावे लागेल. कारण गुजरातमध्ये सत्ताधारी पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा सक्रिय आहे. हे कार्यकर्ते नुसते सक्रिय आहेत असे नाही तर ही निवडणूक भाजपाने जिंकली पाहिजे यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघानुसार त्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी पेज प्रमुख, बुथ प्रमुख व बुथ विस्तारक आणि इतर कार्यकर्ते असे सुत्रबद्ध पद्धतीने निवडणुकीचे व्यवस्थापन केले आहे. तर याबाबतीत काँग्रेस कमकूवत आहे. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे. त्याचे संघटन नाही. आणि त्यांच्याकडे विशेष अशी यंत्रणाही उपलब्ध नाही. याबरोबरच पक्षाअंतर्गत मतभेद असल्याने त्यांच्यात गट-तट अधिक आहेत. या परिस्थितीचा अंदाज घेऊन राहूल गांधी यांनी निवडणुकीची सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे. पण ते त्यात किती यशस्वी होतात. हे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच कळेल. पण बुथ मॅनेजमेन्टकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण निवडणूक व्यवस्थापन हा घटक सुद्धा आधुनिक काळात लोकशाहीत महत्वाचा मानला जातो. असे असले तरीही व्यावसायिक असणारा गुजराती समाज कोणाच्या हाती सत्तेची सुत्रे देतो यावरही बरेच काही अवलंबून आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाची प्रतिक्षा आता शिगेला पोहचली आहे. बघूया........? गुजराती मतदार कुणाच्या हाती राज्याचा कारभार सोपवणार…..?

                                             



                       
                                                  - गंगाधर बनसोडे