महाराष्ट्र गेले ८-९ दिवस अनेक कारणांनी गाजतोय त्यात एल्गार परिषद, भीमा कोरेगाव ची तनावयुक्त परिस्थिती, महाराष्ट्र बंद आणि छात्रभारतीचा पोलिसांनी हुकूमशाही पद्धतीने उधळलेला ४ तारखेचा परिसंवादाचा कार्यक्रम या सर्व घटनांची सोशियल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर मोठमोठ्या बातम्या झाल्या. या अधिवेशनादरम्यान आलेला माझा अनुभव ....
गेली २-३ महिने छात्रभारतीच्या अधिवेशनाची तयारी चालली होती या वर्षीचे अधिवेशन हे ३५ वे आणि ऐतिहासिक अधिवेशन होते , या अधिवेशनाला एक वेगळेच वलय निर्माण झाले होते त्याचे असे की या अधिवेशनामध्ये शिक्षण या प्रश्नांवर राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध विध्यार्थी नेत्यांबरोबर परिसंवाद ठेवला होता. या विद्यार्थी नेत्यांसोबत विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार होती. या परिसंवादात नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, रिचा सिंग, उमर खालिद, प्रदीप नरवाल , यांसारखे अनेक राष्ट्रीय विद्यार्थी व युवा नेते सहभागी होणार होते. त्यामुळे सर्व छात्रभारतीचे सर्व कार्यकर्ते अगदी जोशाने व मेहनतीने अधिवेशनाची तयारी करीत होते. दिनांक २ जानेवारी रोजी आम्ही पुण्याहून जवळपास 40 कार्यकर्ते अधिवेशनास निघालो ट्रेन रात्री १०:५५ ला होती उस्मानाबाद,भूम व परांड्याहुन जवळपास १८० कार्यकर्ते आम्हाला येऊन भेटणार होते. 10.55 ची ट्रेन 1 तासाने उशिरा येणार अशी सूचना आली या नंतर सर्व लोक ट्रेन ची वाट पाहत बसले याच दरम्यान ज्येष्ठ लेखक व अभ्यासक अतुल देऊळगांवकर यांची अचानक रेल्वे स्टेशन वर भेट झाली. त्यांच्या बरोबर आजच्या सामाजिक परिस्थितीवर चर्चा केली.

त्याचदरम्यान आमची ट्रेन आली व आम्ही सर्व ट्रेनमध्ये बसलो व सर्व कार्यकर्ते जे उस्मानाबाद ,भूम, परांड्याहुन आले होते त्यांना पुण्यातून बाबा आढावांच्या कष्टाची भाकर मधून घेतलेले झुणका भाकर सर्वांना दिली व आमचा प्रवास सुरू झाला. ट्रेन एवढ्या गतीने चालत होती की प्रत्येक स्टेशनवर जवळपास अर्धा तास थांबत होती, रेल्वे क्रॉसिंगच तर विचारू नका , साधारणतः पुण्याहून मुंबई ला रेल्वे ने जायला ४ तास लागतात आम्हाला ९ तास म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागला. या प्रवासा दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी चळवळीची गाणी गात आणि घोषणा करत प्रवास केला. ३ जानेवारी रोजी सकाळी ९:३० ला दादरला उतरल्यावर लोकलने गोरेगावला गेलो तिथून न्यूझीलँड हॉस्टेल वर जाऊन प्रथम फ्रेश झालो आणि त्यानंतर नाश्ता केला, त्यानंतर अधिवेशन स्थळी गेलो तिथे संपूर्ण महाराष्ट्रातुन जवळपास ३०० कार्यकर्ते आले होते सर्वांशी ओळख केली आणि चळवळीची गाणी गात आणि घोषणा देत परिसर छात्रभारतीमय केला. या दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी, आमदार कपिल पाटील, अँड.शरद कोकाटे, अजित शिंदे, छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे, उपाध्यक्ष राकेश पवार, सागर भालेराव, मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे ,कीर्ती ,रेश्मा बोरकर, प्रांजली गुंजाळ, सारिका आखाडे आदी उपस्थित होते.
या नंतर अँड.शरद कोकाटे , प्रज्ञाकुमार गाथाडे आणि अजित शिंदे यांनी छात्रभारतीची वाटचाल या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आमदार कपिल पाटील यांनी छात्रभारतीचा संघर्ष या विषयावर माहिती दिली व सरकारी शाळा वाचविण्यासाठी आपल्याला येत्या काळात मोठा लढा उभारावा लागणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाच्या तयारीला सर्वजण लागले. दिनांक ४ रोजी आम्ही सर्वजण जवळपास ६०० लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजेच विलेपार्ले येथील भाईदास सभागृहजवळ सकाळी ९ वाजता पोहोचलो. सर्व कार्यकर्त्यांची नाश्त्याची व्यवस्था तेथेच केली होती परंतु अचानक जवळपास 30 -35 पोलिस तिथे आले प्रथमतः आम्हाला वाटले ते कार्यक्रमाला सुरक्षा देण्यासाठी आले आहे. पण त्यांनी आम्हाला त्यांनी सभागृहात जाण्यास मज्जाव केला. आम्ही सर्वांनी रस्त्यावरच नाश्ता केला, सकाळी १०:३० मिनिटांनी आम्हाला कलम १४९ अनुसार नोटीस दिली आणि कार्यक्रमाची परवानगी नाकारत आहोत असे सांगितले. आम्ही सर्व चिडलो आणि कार्यक्रम होणारच यावर ठाम राहिलो. आम्ही घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना घाबरविण्यासाठी माईक वरून सूचना द्यायला सुरुवात केली व विद्यार्थ्यांना परत जाण्यास सांगितले पण आम्ही आमच्या ठिकाणीच होतो, त्या दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली.

सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी अटक करण्यास सुरूवात केली सर्वप्रथम छात्रभारती चे अध्यक्ष दत्ता ढगे, उपाध्यक्ष राकेश पवार, सागर भालेराव, संदीप आखाडे, सचिन बनसोडे, अनिकेत घुले, ऍड अजित शिंदे, ऍड शरद कोकाटे, रशिद मानियार,लोकेश लाटे,रवि गुंजाळ, रोहित ढाले यांसह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली व बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रुप ने वेगवेगळे करत धक्काबुक्की करत बाजूला नेत गेले. या दरम्यान जवळपास १०० हुन अधिक असणाऱ्या मुली घाबरून गेल्या त्या सर्वांना आम्ही धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन वर जायला सांगितले व आपापल्या गावाला जा असे सांगितले. या दरम्यान रेश्मा आणि मी पोलीसांना सांगितले की आम्हा सर्वांना पोलिस ठाण्यात घेऊन चला मुलींना घाबरवू नका तेव्हा आम्हा सर्वांना जुहू पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले ही माझी पहिली अटक होती. या दरम्यान राकेश पवार, रशीद मनियार आमच्याशी सतत संपर्कात होते. सर्व कार्यकर्त्यांना वेगवेळ्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. जुहू पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्ही तेथील परिसर घोषणा आणि गाण्यांनी दणाणून सोडला. पोलिसांनी दमनशाहीच्या माध्यमातून आमचा कार्यक्रम उधळून लावला होता याचा राग आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये होता.
पोलिसांनी अगदी कार्यक्रमाच्या काही मिनिटे आधी आमच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली याचा आम्ही निषेध करत होतो. त्यावेळी जवळपास सर्व मिडिया तिथे उपस्थित होती. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भेटायला आमदार कपिल पाटील, आमदार विद्या चव्हाण, अनिता पगारे,प्रतिभा शिंदे,अश्विनी सातव, निखिल वागळे व अनेक कार्यकर्ते आले होते. त्या दरम्यान आमदार कपिल पाटील ,रिचा सिंग , प्रदीप नरवाल यांना देखील अटक करण्यात आली. आम्हा सर्वांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले व सायंकाळी ५ च्या दरम्यान वरील सर्व मान्यवरांच्या प्रयत्नाने आमची सुटका करण्यात आली. अशा प्रकारे पोलिसांनी राजकीय दबावाखाली आमचा कार्यक्रम हुकूमशाहीने उधळून लावला. जवळपास दिवसभर स्थानिक, प्रादेशिक व राष्ट्रीय मीडियावर न्युज होती. या अधिवेशनदारम्यान अनेक गोष्टी शिकता आल्या अशा प्रकारे या वर्षीचे हे अधिवेशन अविस्मरणीय ठरले.
----------------------------------------------------------------------------------------
- समता शिंदे,
छात्रभारती , पुणे.