Monday, 1 January 2018

छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी....( विजय ढोबळे)

        नकळतपणे एक-दोन वेळेस डोळ्याच्या पापण्यांनीं उघडझाप करावी आणि त्याचा कानोसा मनाला लागणे कठीण व्हावे तसे मागील वर्ष केव्हा पूर्ण झाले समजलेदेखील नाही. दूरवरच्या एखाद्या अनोळखी देशातील पर्वतरांगेतून प्रवास करताना आपण खिडकीबाहेर डोके काढून निसर्गाने उधळलेल्या रंगांची व त्याच्या कलाकृतीची प्रतिमा डोळ्यात साठवून ठेवण्यात एवढे गुंग होऊन जातो की आपण हजारो मैलांचा प्रवास केव्हा पार केला आहे याचेदेखील भान राहत नाही. हा प्रवास करताना खाच-खळगे, वेडीवाकडी वळणे, चढ-उतार, कच्चे रस्ते अशा अनेक समस्यांचा अनुभव देखील घेत असतो परंतु त्यांच्या परिणामांपेक्षा मन बहरून टाकणाऱ्या सौंदर्यसृष्टीचा आनंद आपल्याला जास्त असतो. प्रवासातील याच आठवणींची शिदोरी आपण नेहमी जवळ बाळगतो. अस्वस्थतेच्या काळात त्याची जास्त गरज असते. याच प्रवासामध्ये आपल्याला आयुष्यभर सोबत देतील असे सहकारीदेखील भेटतात. हा संपूर्ण प्रवास म्हणजेच आपल्या भूतकाळातील विखुरलेले क्षण जे कि आपल्याला काळोख्या रात्रीही चंदाण्यांप्रमाणे आपल्या आयुष्याची वाट उजळून टाकतात.

            भूतकाळातील गोड-कडू आठवणींचा तटस्थ राहून विचार करूयात. तडजोडी आयुष्यात सर्वचजण करतात आपण त्या मोकळ्या मनाने स्विकारुयात. अन्न, वस्त्र, निवारा व मानवी नातेसंबंध एवढ्याच प्रत्येक माणसाच्या गरजा आहेत व आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्या पुरेशा आहेत. विनाकारण भविष्याची चिंता करत व सुंदर आयुष्याची स्वप्न रंगविण्यात फक्त वेळ वाया जातो. अनाठायी हव्यास हा मृगजळासारखा असतो त्याने कुणाचीच तृप्ती होत नाही.

        येणाऱ्या नवीन वर्षात आयुष्यावर भरभरून प्रेम करूयात. भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपुलकीचे चार शब्द बोलूयात. जगामध्ये कोणतीच व्यक्ती चांगली किंवा वाईट नसते फक्त आपण आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवूयात. आपण कुणावर प्रेम करतो त्यांचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा आपल्यावर असंख्य व्यक्ती मनापासून प्रेम करत असतात त्यांचा विचार करूयात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांचे दुःख वाटून घेऊयात. त्यांच्या आनंदाचा परीघ वाढविण्यास मदत करूयात. आपल्या व इतरांच्या चुका माफ करायला शिकुयात. जगात आनंदी राहण्यासाठी असंख्य गोष्टी आहेत परंतु दुःखी होण्यासारखे कुठलेच कारण जगात नाही. लहान मुलांसारखे हसायला व खेळायला ज्याला जमेल तो नेहमीच उत्साही राहतो. अशाच उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत करूयात. सर्वांना नूतन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.💐


   
     


 -विजय ढोबळे (विजे)

No comments:

Post a Comment