Monday, 27 November 2017

#चिल्लर_जिंदगी...(सुमित ढिवरे,एल.एस रहेजा महाविद्यालय,मुंबई)


   एक १०चा कॉइन
आणि २ रुपये सुट्टे..
स्टेशन पर्यंत पोहचवतील येवढेच काय ते शिल्लक पैसे घेउन मी रागा रागात रिक्षा स्टॉपच्या दिशेने निघालो होतो.
मीटर चे ४७ रुपये झाल्यावर whatsapp  मेसेजला रेप्लाय देतांना ५० ची नोट त्याच्या हातात टेकवल्यावर तो रिक्षावाला ३ रूपये चेंज द्यायचा तेव्हा 
' रैहने दो भैया" असे ज्या ज्या वेळेस बोलो होतो ती प्रत्येक 'माजोडी ' आठवण अजून डोळ्या समोरून जातच नव्हती...
रिक्षेतून उतरल्यावर सिंग्नल क्रॉस करतांना मला पूर्वी कधीच न दिसलेले ते खादाड लोकं आणि ते खाऊचे स्टॉल  जमिनीतून प्रकट झाल्यासारखे आज अचानक माझ्या समोर उभे राहिले होते.
समोर येणारा प्रत्येक चेहरा श्रीमंत दिसत होता खिसे भरलेल्या गर्दी सोबत मी आठ मिनिटे चालून कसा तरी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहचलो.
जपून पावले टाकत टाकत दुर पर्यंत माझी नजर TC कुठे दिसतोय का ते शोधत होती. without ticket जाण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच नव्हता.चिड-चिड ,संताप आणि डोक्याचा नुसता भुगा होत होता...
CST ट्रेन मध्ये  बसलो सीटवर बसल्या बसल्या आधीची गाडी ही नव्हती हे माहीत असतांना सुध्दा आजूबाजूला काही 'काळ्या' रंगाच दिसतय का..??
म्हणून शोध सुरु झाला..
माझ्या केविलवाण्या हालचाली बघून,काहीच माहित नसतांना सुद्धा समोर बसलेला पंचेचाळीसीतला काका खाली वाकून माझ काही हरवलंय म्हणून तो पण शोधू लागला..
आता त्याला कोण सांगणार काही तासांपूर्वी CST वरुन येतांनाच "माझं काळ्या रंगाच पाकीट हरवलं होत..."
घोळक्यात किंवा एकटे मिरतांना,छोटी वा मोठी चड्डी किंवा नागडे असतांना सुद्धा ढुंगनाला हात लावताच ज्याचा आधार वाटायचा ते पाकीट 'आधार कार्डा' सोबत मला कायम साठी सोडून गेले होते....
फोन दोनदा vaibrate झाला.. "आता माझ्या जवळ फक्त ५०० आहेत" माझे पाकीट हरवले हे समजल्यावर मला बळजबरी पैसे घेण्यासाठी बोलवलेल्या त्या जिवलग मैत्रीणीचा मेसेज वाचून रिप्लाय न करताच फोन लॉक  केला..
घाटकोपर गेल्यानंतर मागच्या बाजूला गाण्याचा आवाज येत होता.ते नेहमीचेच पैसे मांगणारे भिकारी म्हणून दुर्लक्ष करण्यासाठी मी माझ्या डोक्यात धावणाऱ्या विचारांसोबत खिडकीच्या बाहेर बघत होतो.दोन्ही पाय नसलेली एक लहान मुलगी सरकत सरकत केव्हाच माझ्या पाया जवळ आली होती.
दरवाज्या जवळ असलेल्या, बोगीतल्या दांड्या जवळ उभी राहून तान्ह बाळ हातात घेउन तिची मोठी बहीण एका फळीवर ठेकाधरुन साईबाबाचे गाणे बेसुरात गात होती, त्या समोरच्या काकांनी माझ्या पाया जवळ आलेल्या त्या चिमुरडीच्या हातात पाच रुपये ठेवले. माझ्या दिशेने वळत एका हाताने, माझा पाय हलवत दुसरा हात तिने पुढे केला.. माझ्या कडे नेमकी बोलायला आणि द्याला काहीच नव्हते.
मी फक्त तिच्या डोळ्यांत बघत आतल्या आत फुटफुटलो...
"आज  खरचं काहीच नाही देण्यासाठी...."
दोन सेकंद तशीच माझ्याकडे बघत नंतर पुढे पुढे सरकत ती दिसेनाशी झाली....
मोबाईल पुन्हा vaibrate झाला...

" मला १०-१५ मिनिटे उशीर होणार..
मीटिंग मध्ये आहे...सॉरी"
कोणतेही बाहुले add न करता मी तीला रिप्लाय केला.
"...ओके..."
डोक्यातली चिड चिड.... माझ्या कडे विनाकारण बघणारा समोर बसलेला काका आणि हात पुढे करुन "डोळ्यांनीच" पैसे मागणारी ती मुलगी, पुढे जाणाऱ्या ट्रेन पेक्षा वेगाने डोक्यात विचार धावत होते, खिडकीच्या बाहेर झप झप जाणाऱ्या आकृत्यां कडे बघत, मी डोक्यात उडालेल्या गोंधळाला वाट दाखवण्याचा निष्फल प्रयत्न  करत होतो...
CST  येइपर्यंत  केव्हाच पाऊस सुरु झाला होता...
मी without ticket सुखरूप स्टेशन च्या बाहेर पडलो. आमच्या नेहमीच्याच  जागेवर भींतीचा आडोसा घेऊन पावसाचा आवाज ऐकत मैत्रिणीची वाट बघत उभा होतो.रस्त्याच्या कडेला ताडपत्रीने बांधलेले घर पावसापासून वाचवण्यासाठी दोघे माय लेकं आरडाओरडा करून दोरी बांधत होते..
२-३ मुलं सिगारेट फुकत उभे होते.एक जोडप ओठाला ओठ लावण्याच्या बेतात बिलगद होत. कुडकुडनारा एक कुत्रा  बसण्याची जागा शोधण्यासाठी तिथेच गोल गोल घुटमळत होता.
खिशात पैसे नसतांना फ्री मध्ये ऐकायला मिळणारा पावसाचा आवाज,मी हाफाफल्या सारखा डोळे बंद करून कानात जीरवत होतो..
छत्री बंद करण्याच्या आवाजा सोबतच तिने मागून मला डोक्यावर टपली मारली..
"मूर्ख आहेस तु पाकीट कसं  हरवलस..? हे घे आधी.."
अस बोलून माझ्या हातात ५०० चि नोट आणि ATM card कोंबले.
मी काही बोलण्याच्या आत माझा हात पकडून ती मला पुढे घेउन जात होती...
"हे office वाले पण ना  साले...किती वेळ केला ...आज पप्पाचा बर्थडे आहे....माहित होत तरी पण ना.."
एकाच दमात ती सर्वच सांगण्याचा प्रयत्न करत होती.
धावत धावत आम्ही प्लॅटफॉर्म १ वर पोहचलो .
शेवटचाच लेडीज ड्ब्बा पकडून ती आत शिरली.
लगेचच मोठा भोंग्याचा आवाज  करुन तीची ट्रेन निघाली..
इशाऱ्यानेच कॉल करते असे सांगुन ती bye bye करत होती...
धावल्या मुळे फुललेला श्वास..विनाकारण चेहऱ्यावर आलेले हसू, "पिन कोड" माहीत नसलेले ATM कार्ड आणि ५०० रुपये हातात तसेच  पकडून मी मागे वळलो...
तोच समोर उभा असलेल्या काळ्या पांढऱ्या ड्रेस मधल्या TC ने एक हात पुढे करत माझ्या दोन्ही डोळ्यात बघत विचारले..
तिकिट...??


- सुमित ढिवरे.
(लेखक हे एल एस  रहेजा चे माजी विध्यार्थी असून सध्या मुंबई येथे चित्रपट क्षेत्रात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून  काम पाहतात.)
ईमेल id- divresumit@gmail.com 

Saturday, 25 November 2017

विचारांचे सीमोल्लंघन.....(टीम वृत्तवेध)





            '' जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे सामर्थ्याचे पाठबळ असणे आवश्यक असते '' असे एका तत्ववेत्याने फार पूर्वी म्हंटले होते . आज एका बलाढ्य वैचारिक सामर्थ्याची खरोखरच गरज भासत आहे, कारण जे विचार करताहेत त्यांच्या मात्र हत्या केल्या जात आहे. 
एकीकडे न्यायालय अनेक प्रकारचे स्वातंत्र्य देत आहे, पण वैचारिक भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यास मात्र समाजकंटक विरोध दर्शवित आहे. तेवढी आपण नावापुरती लोकशाहीची मूल्ये स्वीकारली , पण आचरणात आणली नाहीत . सध्याच्या आभासी जगातून बाहेर येण्यासाठी जगण्याला वास्तवतेची जोड द्यावी लागणार आहे. 

आज समाजात वैचारिक विषमता फार टोकाला भिडलेली दिसत आहे.विचारवंतांच्या दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचे खरे दुर्दैव झाले आहे . आज या देशात  कोणाला ऑक्सिजन  मिळत नाही म्हणून जीव सोडावा लागत आहे , तर काहीजण पशूला वाचवण्यासाठी जिवंत  माणसांची हत्या करीत आहे. 

११ व्या शतकात ज्ञानेश्वरांनी '' विश्वाचे आर्त  माझ्या मनी  प्रकटले .... '' असे म्हंटले होते. या ज्ञानेश्वरांना समाजाने तितकाच त्रास दिला . सत्वशील विचारांची गंगा समाजापर्यंत पोहचवत मूढांना सुज्ञ करण्याचा जगतगुरु तुकारामांना समाजाकडून हाच त्रास झाला होता. आपण कोण आहोत ? कशासाठी आलोय ? आणि आयुष्याला आपण काय परत देणार ? या प्रश्नांचा  एकदा सारासार विचार केल्यास मानवी जीवन पोहचेल. यासाठी सर्वांच्या विचारांच्या सीमोल्लंघन व्हावे, हीच अपेक्षा करूयात . 



-टीम वृत्तवेध

सागरिका घोष यांच्या नव्या पुस्तकाच्या घेतलेला हा संक्षिप्त आढावा


इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाचा  आढावा सागरिका घोष  या  पत्रकारितेमध्ये प्रत्यक्षात काम केलेल्या स्तंभलेखिकेने  आपल्या  या नव्या पुस्तकामध्ये मांडला  आहे. बालपणापासून घरातील उच्च प्रशासकीय पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांना या क्षेत्राची जाण  ही  आधीपासूनच आहे हे त्यांचे साहित्य वाचल्यावर लगेच समजते. त्यांचे विश्लेषण , अभ्यास, व्यासंग  हे  त्यापासून तयार होत गेले. अजूनही त्या सामान्य वाचकाला समजेल अस  लिखाण नियमीतपणे करत असतात. तर जाणून घेउयात नेमके  कोणते पैल्लू त्यांनी इंदिराजींचे "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " या पुस्तकामध्ये  मांडले आहेत ते...   


     १९६३ साली डोरोथी नॉर्मनला लिहिलेल्या पत्रात इंदिराजी म्हणतात, इथला राजकीय कोलाहल मला असह्य होतो. असं वाटतं , दूर इंग्लंडमध्ये एखाद्या छोट्याश्या घरात कायमचं स्थायिक व्हावं . याच इंदिराजी १९७७ च्या पराभवानंतर , पुन्हा रायबरेलीत येतात. उघड्या जीपमधून एखाद्या नायिकेसारख्या रोड शो करतात आणि हजारोंच्या जमावापुढे विरोधकांना जणू सांगतात, "मी पळून गेले नाहीये. मी इथेच आहे आणि मी लढणार आहे." हा कमालीचा विरोधाभास हे इंदिराजींच्या वैयक्तिक आयुष्याचं , त्यांच्या राजकीय निर्णयांचं,त्यांच्या आर्थिक धोरणांचं आणि त्यांच्या वादळी कारकिर्दीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सागरिका घोष यांनी लिहिलेलं "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " हे व्यक्तिचित्र वाचताना हे पानोपानी जाणवत राहतं .
नेहरूंच्या  कुटुंबात आपल्या आईची होणारी घुसमट आणि एकटेपणा पाहून आलेली अलिप्तता, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करताना आलेलं अपयश या सगळ्यातून ऐन उमेदीच्या वर्षांत एक बंडखोर, स्वतंत्र आणि महत्तवाकांक्षी इंदिरा घडत होती.
नेहरूंनी राजकीय वारसदार म्हणून त्यांना घडवलं नाही पण
राजकीय धामधुमीपासून आणि सत्तेच्या प्रभावापासून इंदिराजी कधीच दूर राहू शकल्या नाहीत. सत्ता आणि त्यातून येणारं निरंकुश सामर्थ्य हे त्यांच्यासाठी टॉनिक होतं त्यांनी वेळोवेळी नाकारलं असलं तरीही . पुस्तक वाचताना हे अधिकच स्पष्ट होतं .
एकाधिकारशाही , धक्कातंत्र यातून घेतलेल्या त्यांच्या काहि निर्णयांनी विरोधकांना निष्प्रभ केलं , लोकशाही संस्थांना कमकुवत केलं , आणि पक्षाला घराणेशाहीचं बटीक केलं .

 आर्थिक  धोरणांबद्दल कमालीचं गोंधळलेपण आणि एकवाक्यतेचा अभाव यामुळे गरिबी हटाव फक्त एक घोषणा होऊन बसली.
त्याचवेळेस त्यांचा लढवय्येपणा दिसतो तो बांग्लादेशच्या मुक्तिसंग्रामात, मिझोरामच्या सामिलीकरणात आणि ऑपरेशन ब्लुस्टार मध्ये. त्यांचा राष्ट्रवाद दिसतो तो निक्सानपुढे न झुकण्यात आणि अणुचाचणीच्या यशस्वीतेत.
एकाच वेळेला
इंदिराजी म्हणूनच मग विरोधाभासाचं एक आगळं रसायन होऊन बसतात. इंदिरा गांधी एक व्यक्ती न राहता ती प्रवृत्ती बनून जाते. लोकशाहीचा जप करत हुकूमशाही लादणारी , राजेशाही बंद करणारी पण पक्षांतर्गत राजेशाही जोपासणारी, कमालीचं प्रेम आणि पराकोटीचा द्वेष या दोन्हीची सारखीच धनी होणारी. इंदिराजींच्या व्यक्तिमत्वामागच्या या प्रवृत्तीला समजून घेण्यासाठी तरी नक्कीच हे पुस्तक वाचलं पाहिजे.

अभिषेक राऊत .( लेखक हे संगणक अभियंता असून सध्या रानडे संस्थेचे विद्यार्थी आहेत.)

Friday, 24 November 2017

बुलेट ट्रेन बाबत.....(प्रसाद भणगे यांनी घेतलेला आढावा)

जपानच्या अध्यक्षासमवेत बुलेट ट्रेन प्रकल्प कार्यान्वित करतांना

विकास विकास  म्हणता  आज आपल्या देशात  बुलेट ट्रेन  नीव आखली गेली, खरं  तर बुलेट ट्रेन ही  खूप  फायदा  करून देणारी असली तरी त्याने विकासाची गंगा ही काही वाहणार नाही आहे.   . कारण या देशात एकी कडे उत्तर प्रदेश  सारख्या राज्यात शेकडो बालक ऑक्सिजन च्या असुविधेमुळे  मृत्युमुखी पडताय, पूर्ण देशात आज कच्चा तेलाचा भाव 50 रुपये/byarel असताना ही पेट्रोल डिझेल चे भाव हे गगनाला भिडले आहेत. तिकडे आपला विकास दर GDP हा उतरत  चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं  म्हणजे भारतीय बाजार पेठ जी  जगातील  मोठी बाजार पेठ म्हणून नावारुपाला येत आहे.  ती पण  आज कुठेतरी मंदावली आहे. मग एवढे  सगळे  दिसत असतांना  जर आपल्या वाट्याला  विकासाच्या नावाखाली जर बुलेट ट्रेन येत असेल तर ती  खरंच फायद्याची आहे का  हे आपण एकदा सचोटीने  पडताळून पहायला हवे.  
खरं  तर सामान्य माणसाची विकासाची  व्याख्या ही खूप सोपी असते, ती म्हणजे पेट्रोल,डिझेल आणि भाजी-पाला ह्या गोष्टी रास्त दरात उपलब्ध होणे अणि शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव मिळणे येवढच आह़े.


 तसा माझा काही बुलेट ट्रेन ला विरोध आहे अस नाही अणि बुलेट ट्रेन मुळे  रोजगाराची निर्मिती होईल हे ही मला पटतय. 
अर्थातच बुलेट ट्रेन मुळे   बाकी देशांच्या आपला देशाकडे पहायचा दृष्टीकोन ही बदलेल. या देशात विकासाचे वारे अजून वेगाने वाहू लागतील हे ही तितकाच सत्य आहे  आणि आपल्या कर्तबगार पंतप्रधानच्या परराष्ट्रीय धोरणामुळे अणि सर्वाराष्ट्रांशी  शांती पूर्वसंबंधांमुळे  हा देश सुजलाम सुफलाम झाल्या शिवाय राहणार नाही हे ही मी या ठिकाणी नमूद करू  इच्छितो. 
 विकसनशील देशात असे  प्रकल्प उभे राहणे ही  विकासाला पुरक असणारी बाजू आहे, पण अशा  प्रकल्पांसाठी लागणारी भारतीय शेत जमीनीचे संपादन होणार असेल तर हे असे प्रकल्प ही विकासाला तारक ठरतील की मारक ठरतील हे ही आपण बघायला हवे . आज देशाची  ओळख जरी औद्योगिकदृष्ट्या प्रगत   राष्ट्राकडे जात असले तरी ह्या देशाची खरे  मुळ हे  शेतीच आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. ह्या कृषी प्रधान ओळख असलेल्या  देशात भारतीय शेती  ही उद्ध्वस्त होणार नाही अणि बळीराजा ही हतबल होणार नाही ह्याची काळजी प्रामुख्याने जर येथील राज्यकर्त्यांनी  घेतली तर ह्या "बुलेट सुसाट विकासाला" सर्व सामान्यांचा आणि बळीराजा चा  ही पाठींबा असल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान मोदींच्या ह्या बुलेट स्वप्नाला माझ्या शुभेच्छा !!
-प्रसाद भणगे . BE E&TC

Thursday, 23 November 2017

वर्दीतील खरे रूप आता...(वाचा सांगली हत्याकांडा बाबत)

सदरक्षणाय खलनिग्रहणाय.....की उलट अशी स्थिती होतेय आज?
सध्या सांगली पोलिसांची 'कौर्य'कथा खुपच चर्चेत आली आहे आणि ती चर्चा करणे ही तितकेच गरजेचे सुद्धा आहे. कारण यामुळे आपण अंगावर वर्दी घातली म्हणजे काहीही बेधडकपणे करू शकतो हे आजच्या वर्ग-३ पासून ते वरच्या वर्गापर्यंत बहुतेकांना वाटत आहे.
          जेव्हा समाजाला असुरक्षितता वाटते  तेव्हा ती असुरक्षितता दूर करण्याचे काम शासकीय नियमांनुसार प्रथमतः पोलिसांचे असते मग बाकीच्या यंत्रणा असतात. परंतु आता हे चित्र पूर्णपणेच बदलले दिसतेय. कारण आजच्या समाजाला ह्या लोकांच्या 'तडजोडीची' भीती ही अधिक वाटत असते. कारण जशी दरोडेखोराची जात असते तशीच काही ह्या तडजोड करण्याऱ्या लोकांची असते. जर का कोणाचा या जगात यासंबंधी 'वाली' नसेल तर मग त्या संबंधिताला किती मरण यातना सहन कराव्या लागत असतील ते देवच जाणे. कारण हे गणित सर्व पैस्यावर अवलंबून असते.मग फार तर फार पुढे हे गणित आजच्या भाषेत दूसरी तडजोडी म्हणजे शारीरिक असते. पण जास्त करुण पैसा हा मोठा ठरत असतो.
      साधे उदाहरण घ्यायच म्हंटले की आपण वाहतूक पोलिसांचे घेऊयात. ह्या लोकांच जास्त लक्ष हे वाहतूक नियमनावर नसून ते दंडात्मक (म्हणजेच तडजोडीची)  कारवाईवर जास्त असते. वाहतूक नियमनाचे मुळचे काम सोडून ही पोलीसं दररोज अनेक लोकांना या तडजोडीला सामोरे जाण्यास भाग पाडतात.
       हे सर्व सांगण्याचा उद्देश् एकच होता की महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून ही वर्दीतील मुघलाई चालू आहे.तुरुंगातील मंजूळा शेट्ये प्रकरण शांत होत नाही तो पर्यन्त हे सांगलीचे प्रकरण समोर आले. अनिकेत कोथळे ह्या मुलाच्या बाबतीत हेच घडले. पोलिसांच्या ह्या क्रूरपणामुळे गेल्या दोन महिन्यात ही दोन बळी गेलेत. कुठतरी वैयक्तिक हेव्यादाव्या पोटी त्याला अटक करुन लवकरात लवकर न्यायालयीन कामकाज ओळखीच्याच वकीलामार्फ़त उरकूण पोलिस कोठडी मिळऊन घेतली. कारण यामध्ये आरोपीस योग्य ती 'ट्रीटमेंट' देता येते.  जेवढी रक्कम ( तडजोडीची ) बाहेरून मिळालेली असते , तेवढा राग मग यामध्ये काढला जातो. परंतु येथे तर कौर्याची परिसीमा झाली किरकोळ गुह्यांतील आरोपीला थर्ड डिग्री देतांना त्यांच्या जीवण-मरणाच्या विचार न करता त्याला बेदम मारण्यात आले आणि त्यात कोथळे चा मृत्यु झाला.पण येथे यांचे शौर्य(कौर्य) थांबले नाही.. ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह मोठ्या हिमतीने (उपस्थित पोलीसांशी संगतमत करूण) पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन एका दुरच्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला.
         येथे प्रश्न निर्माण होतो की हे सर्व धाडस निर्माण कस काय होत असेल.असे कोणते घटक असतात की माणसाला इतके क्रूर रानटी पशु सारखे वागायला वा कृती करायला भाग पाडत असतील. तर अनेक वर्ष ही लोक त्याच ठिकाणी ठाण मांडून बसलेली असतात.यातून अनेक आर्थिक संबंध हे तयार झालेले असतात...त्यात वैयक्तिक लागेबांधे.......राजकीय पाठबल...स्वतःचा खोटा रुबाब...आपण म्हणजेच सर्वकाही ही वृत्ती...नव्या जगातील 'सिंघम' प्रतिमा..त्यात वर्दी...प्रतिमेचा दुरुपयोग....समांतर पोलीस ठाणे...असे अनेक कारणे यामध्ये आहेत.मग येथूनच कुठून तरी ह्या वृत्तीचा उगम होतो आणि मग पदाची ,स्वतःच्या अधिकारांची नैतिकता विसरून युवराज कामटे सारखे अधिकारी पुढे येतात आणि असले कौर्य करुण बसतात. ही खूप भयान आणि मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. या मध्ये नुसताच दोष काही समोर असलेल्या लोकांचा नाही आहे तर यांची सर्व कारनामे माहित असून त्यांना सहाय्य करणाऱ्यांचा सुद्धा आहे. सध्या तर शिस्तप्रिय असे पोलीस अधिकारी उच्च स्तरावर तेथे आहेत. समाजात त्यांची नुसतीच भाषणे आनंदाने ऐकली जातात. ह्या अधिकाऱ्यांनी समाजाला मार्गदर्शन बंद करुन जर स्वतःच्या विभागापूर्ता जरी विचार करुन ह्या चांगल्या गोष्टींचा अंमल केला तरी खूप उपकार होतील. आज ह्या घटनेमुळे संपूर्ण पोलिस खात्याला जबाबदार नक्कीच धरता येणार नाही,परंतु काल मुंबई ,आज सांगली आणि अजून उद्या काही.....! मग हीच शृंखला चालू ठेवायची का ? हे गृह खात्यानेच ठरवावे.... कारण 'वर्दी'तील खरे रूप आता बाहेर येत आहे....



- अमित येवले.
BE (Electrical)
master's in Public Administration

श्रीपाद जोशी लिखित 'हवी तशी नक्षी' पुस्तक प्रकाशन....

श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला


पुणे प्रतिनिधी - ' हे पुस्तक वाचतांना मी स्वतः नापास झालोस, फार गुंतागुंतीचे असे महाकाव्य स्वरूपाचे लेखन करण्यात आले आहे. अनुभूति व अभिव्यक्ती यांची सांगड घालणारे हे लेखन जीवनातील अनेक प्रश्न सोडविन्यास मदत ठरू शकते . जोशी हे सामान्य व्यक्ती आहेत पण त्यांची सामाजिक तळमळ, ऊर्मी ही असामान्यतेला शोभणारी आहे.' असे ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा व दिलीपराज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने
श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित 'हवी तशी नक्षी' पुस्तक प्रकाशन सोहळा ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. अश्विनी घोंगडे या उपस्थित होत्या.

 या प्रसंगी अश्विनी धोंगडे म्हणाल्या, 'हे पुस्तक वाचल्यानंतर विचार करण्याला लावेल असेच आहे. ललीतबंधच्या ऐवजी हे पुस्तक 'नाट्यमय स्वगत' अशा स्वरूपात मोडेल असे आहे. या संपूर्ण पुस्तकात एकोणवीस स्वगत आहेत. नक्षी ही एक कला आहे त्यामुळे खरंच मनाला हवी तशी विचारांची नक्षी या मध्ये मांडली आहे.

श्रीपाद जोशी या प्रसंगी म्हणाले, 'आज समाजात कोणी शीर मागतोय तर कोणी गळा मागतोय. पण हे सोडून समाजात बुद्धि वा मेंदू मागण्याची हिम्मत कोणी करत नाही. ही सध्याची शोकांतिका आहे.३० वर्षांपासून माध्यमांनी केलेली लोकांच्या केलेल्या बुद्धिबेदाची प्रेरणा या पुस्तकाच्या मागे आहे. विचारातून विचार आणि  प्रश्नांतुन प्रश्न जोपर्यंत निर्माण होत नाही, तो पर्यंत आयुष्य सुंदर होऊ शकत नाही. मी याच प्रश्नांचा शोध या माझ्या लेखनातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.'

 या प्रसंगी दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे ,उद्धव कानडे, सचिन इटकर , संतोष शेणई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन इटकर यांनी केले तर सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.