१९६३ साली डोरोथी नॉर्मनला लिहिलेल्या पत्रात इंदिराजी म्हणतात, इथला राजकीय कोलाहल मला असह्य होतो. असं वाटतं , दूर इंग्लंडमध्ये एखाद्या छोट्याश्या घरात कायमचं स्थायिक व्हावं . याच इंदिराजी १९७७ च्या पराभवानंतर , पुन्हा रायबरेलीत येतात. उघड्या जीपमधून एखाद्या नायिकेसारख्या रोड शो करतात आणि हजारोंच्या जमावापुढे विरोधकांना जणू सांगतात, "मी पळून गेले नाहीये. मी इथेच आहे आणि मी लढणार आहे." हा कमालीचा विरोधाभास हे इंदिराजींच्या वैयक्तिक आयुष्याचं , त्यांच्या राजकीय निर्णयांचं,त्यांच्या आर्थिक धोरणांचं आणि त्यांच्या वादळी कारकिर्दीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सागरिका घोष यांनी लिहिलेलं "इंदिरा: इंडियास मोस्ट पॉवरफुल प्राईम मिनिस्टर " हे व्यक्तिचित्र वाचताना हे पानोपानी जाणवत राहतं .
नेहरूंच्या कुटुंबात आपल्या आईची होणारी घुसमट आणि एकटेपणा पाहून आलेली अलिप्तता, वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करताना आलेलं अपयश या सगळ्यातून ऐन उमेदीच्या वर्षांत एक बंडखोर, स्वतंत्र आणि महत्तवाकांक्षी इंदिरा घडत होती.
नेहरूंनी राजकीय वारसदार म्हणून त्यांना घडवलं नाही पण
राजकीय धामधुमीपासून आणि सत्तेच्या प्रभावापासून इंदिराजी कधीच दूर राहू शकल्या नाहीत. सत्ता आणि त्यातून येणारं निरंकुश सामर्थ्य हे त्यांच्यासाठी टॉनिक होतं त्यांनी वेळोवेळी नाकारलं असलं तरीही . पुस्तक वाचताना हे अधिकच स्पष्ट होतं .
एकाधिकारशाही , धक्कातंत्र यातून घेतलेल्या त्यांच्या काहि निर्णयांनी विरोधकांना निष्प्रभ केलं , लोकशाही संस्थांना कमकुवत केलं , आणि पक्षाला घराणेशाहीचं बटीक केलं .
आर्थिक धोरणांबद्दल कमालीचं गोंधळलेपण आणि एकवाक्यतेचा अभाव यामुळे गरिबी हटाव फक्त एक घोषणा होऊन बसली.
त्याचवेळेस त्यांचा लढवय्येपणा दिसतो तो बांग्लादेशच्या मुक्तिसंग्रामात, मिझोरामच्या सामिलीकरणात आणि ऑपरेशन ब्लुस्टार मध्ये. त्यांचा राष्ट्रवाद दिसतो तो निक्सानपुढे न झुकण्यात आणि अणुचाचणीच्या यशस्वीतेत.
एकाच वेळेला
इंदिराजी म्हणूनच मग विरोधाभासाचं एक आगळं रसायन होऊन बसतात. इंदिरा गांधी एक व्यक्ती न राहता ती प्रवृत्ती बनून जाते. लोकशाहीचा जप करत हुकूमशाही लादणारी , राजेशाही बंद करणारी पण पक्षांतर्गत राजेशाही जोपासणारी, कमालीचं प्रेम आणि पराकोटीचा द्वेष या दोन्हीची सारखीच धनी होणारी. इंदिराजींच्या व्यक्तिमत्वामागच्या या प्रवृत्तीला समजून घेण्यासाठी तरी नक्कीच हे पुस्तक वाचलं पाहिजे.
अभिषेक राऊत .( लेखक हे संगणक अभियंता असून सध्या रानडे संस्थेचे विद्यार्थी आहेत.)
No comments:
Post a Comment