आज तसं बऱ्याच दिवसांनी पेन हातात घेतलंय. काय लिहावं याबद्दल काहीही कल्पना नाही. जितका कोरा कागद तितकंच मनही कोरं. विषय,विचार मनात येतच नाहीयेत. विचारांविना शब्दांनाही फारशी ताकद नाही. अधिक सामर्थ्यवान कोण? विचार की शब्द असले प्रश्न मनात घुटमळत राहतात. विचारच सामर्थ्यवान. शब्द तर केवळ एक माध्यम, विचारांना व्यक्त करण्याचं. खरंतर आम्ही खेळायला हवेत विचारांचे खेळ. पण बऱ्याचदा आम्ही शब्दांचेच खेळ खेळतो आणि त्यातच गुरफटून राहतो.
सामर्थ्यवान कोण हा अख्या मानवजातीचा आवडता प्रश्न. ह्याचं उत्तर शोधण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजेच मानवजातीचा इतिहास आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अर्थातच जे सामर्थ्यवान ठरतात तेच इतिहास लिहितात आणि त्यांना मानवेल असाच लिहितात. म्हणून मग सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावूनही राम पूज्यनीय ठरतो आणि बघताबघता रावण खलनायक ठरवला जातो. इतिहास लिहिताना तेवढी काळजी प्रत्येक विजेता घेतोच मग तो भारतातला असूदे किंवा परदेशातला.
पण भारतासारख्या भावनाप्रधान देशात इतिहास लागतोच कारण तो आम्हाला महापुरुष पुरवतो. या महापुरुषांत राम, कृष्ण , शिवाजी , महाराणा प्रताप , ते गांधी , नेहरू , आंबेडकर असे सगळे येतात. महापुरुषांच काय करायचं हे आम्ही फार आधीच ठरवलंय. आम्ही शक्यतो त्यांचे पुतळे बांधतो. विमानतळ, रेल्वे स्थानक यांना त्यांची नावं देतो, शक्य झाल्यास त्यांच्या नावाने आम्ही काही योजना घोषित करतो, त्यांच्या नावाने आम्ही मतं मागतो , त्यांच्या नावाचे पुरस्कार देतो, त्यांच्या स्मारकासाठी समुद्रात , बेटांवर , मिलमध्ये जागा देतो, देवघरात त्यांचे फोटो ठेवतो , वर्षातून दोन जयंत्या , पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि सगळ्यात महत्त्वाचे असे जे त्यांचे विचार त्यांना सोयीनुसार आपल्या शब्दांत मांडून आपल्या भविष्याची सोय करून ठेवतो. शक्यतो आम्ही महापुरुष वाटून घेतो. हा आमचा तो तुमचा असं. मग या महापुरुषांच्या विचारांवर चर्चा, मतभेद, वाद-विवाद होण्यापेक्षा त्यांच्या अनुयायांमध्ये मारामारी होणं जास्त सोयीस्कर असतं.
पूर्वी महापुरुष होणं जरा कठीण होतं. पण आजकाल ते सोप्पं झालंय. अनुयायी आजकाल भाड्यानेही मिळतात. विचार सामर्थ्यवान असतात पण आजच्या धावपळीच्या युगात विचार करण्यासाठी कुणाकडे फारसा वेळ नसतोच. त्यापेक्षा तोडफोड आणि मारामारी करून जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. शिवाय आजकाल मीडियासुद्धा सगळीकडे हजार असतो. त्यांच्या लेखी ‘NEWS value ” ला महत्त्व असतं . तात्त्विक विरोधापेक्षा चार बसेस जाळल्यात तर त्याची “NEWS value” साहजिकच जास्त असते. त्याला जास्त प्रसिद्धी मिळते . जर तुमच्या शहरात, गावात तुम्ही बसेस जाळू शकत असलात आणि कामकाज बंद पाडू शकत असलात तर तुमची ‘वट ‘ वाढते . तुम्हाला लोक आधी ‘दादा’ , मग ‘साहेब’ आणि मग ‘सरकार’ बोलू लागतात. तुमच्याही नकळत तुम्ही ‘सामर्थ्यवान’ होऊ लागता. कारण शेवटी ‘सामर्थ्यवान कोण’ हाच प्रश्न असतो. कुठल्याही विषयाविना गुंफलेली ही रॅंडम विचारांची कंडम साखळी पुन्हा सुरुवातीलाच येऊन थांबते.
अभिषेक खुप छान लिहले आहेस.
ReplyDeleteDear reader thanks
Delete